आरोग्यसेवा, सामाजिक कार्य, पर्यावरण अभ्यास आणि संवर्धन स्वयंसेवक अशा त्रिवेणी संगमातून घडला आदर्श व्यक्तिमत्वाचा प्रवास
स्काय न्यूज टुडे | राहुल जाधव : प्रत्येक स्त्रीच्या अंतरंगात एक आदिशक्ती वास करते. तिच्या कर्तृत्वात सृजनाची ताकद असते, जिद्दीत अशक्याला शक्य करण्याचे सामर्थ्य असते, तर संघर्षाच्या वाटेवरून मार्गक्रमण करताना तिच्या आत्मविश्वासाला अनुभवांची भक्कम जोड मिळत असते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, संकटांनी कितीही घेरले, तरी मनातील स्वप्नांवर विश्वास ठेवून पुढे जाणारी स्त्री स्वतःचे आयुष्य घडविण्याबरोबरच अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरते. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात अशाच कर्तृत्ववान स्त्रियांच्या संघर्षमय प्रवासाला, त्यांच्या जिद्दीला आणि समाजासाठीच्या योगदानाला मानाचा मुजरा करणारे ‘स्काय न्यूज टुडे’चे विशेष सदर म्हणजे ‘नवदुर्गा : कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दुर्गा!’
या विशेष सदरातून समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र मुद्रा उमटविणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाची वाट निर्माण करणाऱ्या आणि नव्या पिढीसमोर आत्मनिर्भरतेचा आदर्श ठेवणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. याच प्रेरणादायी वाटचालीतील एक आश्वासक नाव म्हणजे कणकवली तालुक्यातील लोरे येथील विरश्री रावराणे !
मुंबईच्या मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आणि मूळच्या कणकवली तालुक्यातील लोरे गावच्या विरश्री रावराणे पर्यावरण अभ्यास आणि संवर्धन या क्षेत्रात स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. मुंबई विद्यापीठातून जैवरसायन विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्याच विषयात पुढे आपली कारकीर्द सुरु केली. सध्या त्या पुण्यातील राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र येथे तांत्रिकी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोविड काळात त्यांनी देशस्तरीय कोविड निदान चाचणीच्या सांघिक प्रयत्नात राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रातर्फे मोलाचे योगदान दिले. याकरता त्यांचा केंद्रातर्फे आणि बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गौरव करण्यात आला. जैवरसायन विषयाव्यतिरिक्त त्या संस्थेतर्फे भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाकरवी सुरु केलेल्या 'शून्य कचरा व्यवस्थापन' अभियानाकरता समन्वय अधिकारी म्हणून देखील काम करतात.
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत राहूनही त्यांनी त्यांच्या कोकणातील मूळ गावाशी जुळलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. लहानपणापासून त्यांना निसर्गाची आवड होतीच परंतु निसर्गात होणारे बदल आणि हानी पाहता पाहता या आवडीचे रूपांतर काळजी आणि जबाबदारी यात झाले. पुण्यातील पर्यावरण शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या इकॉलॉजिकल सोसायटी या नामांकित विश्वस्त संस्थेतून 'नैसर्गिक साधनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि निसर्ग संवर्धन' या विषयामध्ये केलेला अभ्यासक्रम त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला. यामुळे त्यांना निसर्ग संवर्धनाची खरी दिशा सापडली. संस्थेतर्फे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या 'माझी वसुंधरा अभियानात' पुणे विभागात स्वयंसेवक म्हणून मार्गदर्शनाचे काम केले. कुठल्याही क्षेत्रात योगदान देण्यापूर्वी त्या त्या क्षेत्राचे योग्य ते अधिकृत ज्ञान असणे आवश्यक असते यावर त्यांचा ठाम विश्वास असल्या कारणाने त्यांनी पुढेही या क्षेत्रातील शिक्षण आणि योगदान चालू ठेवले. Nature Conservation Foundation, बंगळूरू यांचा सिंधुदुर्ग येथे आयोजित 'उष्णकटिबंधीय जंगलाचे पर्यावरणीय पुनरुजीवन' हा निवासी अभ्यासक्रम पूर्ण केला. पुणे शहर आणि कोकणातील काही भागात त्यांनी लोकसहभागाने यशस्वी पर्यावरणीय पुनरुजीवन प्रकल्प राबविले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत पुणे जिल्ह्यातील रोटरी क्लब पिंपरी टाऊन तर्फे विरश्री रावराणे यांचा हरित संरक्षक म्हणून गौरव करण्यात आला.
आपली निसर्गसंस्कृतीचा वारसा जपण्याकरता विरश्री लहान मुलांकरिता शाळा आणि सामाजिक स्तरावर विविध सक्रिय आणि कलात्मक उपक्रम देखील घेतात. स्थानिक वनस्पतींचे माहिती संकलन, बीज संवर्धन आणि रोपे तयार करून ती विविध व्यक्ती, रोपवाटिका आणि पर्यावरणीय पुनरुजीवन प्रकल्पाना भेट देऊन अप्रत्यक्षपणे निसर्गसेवेचे निरंतर पालन करतात.
जागतिक जैवविविधता हॉटस्पॉट असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या आणि अरबी समुद्राने वेढलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निसर्ग अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा आहे. नैसर्गिक साधनसंपतीचा विनाश आणि प्रदूषण यामुळे होणाऱ्या वातावरणीय बदलांना रोखण्याकरता सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे हे जाणून त्यांनी, सिंधुदुर्ग येथील पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना एकत्रित आणण्याकरता मालवण येथे कार्यरत असलेल्या 'Youth Beats for Climate' आणि 'Ecomates' या संस्थेच्या मदतीने 'सिंधु निसर्ग संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन केले. निसर्गसेवकांच्या एकत्रिकरणामुळे सिंधुदुर्ग जिह्यातील निसर्ग संवर्धन कार्याला अधिकच बळ आले आहे. कुटुंब आणि नोकरी यासोबतच पर्यावरण जपण्याची आपली नैतिक जबाबदारी असते याबद्दल विरश्री रावराणे आग्रही आहेत.
संघर्षातून स्वावलंबनाकडे, स्वावलंबनातून सेवेकडे आणि सेवेतून समाजविश्वासाकडे वाटचाल करणाऱ्या विरश्री रावराणे या खऱ्या अर्थाने ‘नवदुर्गा’ सदरातील कर्तृत्वाचा गौरव ठरणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.
त्यांच्या आजवरच्या कार्याला आणि भविष्यातील सामाजिक, राजकीय व व्यावसायिक वाटचालीला ‘स्काय न्यूज टुडे’ डिजिटल मीडिया परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
▪️ अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

