Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कु. भाग्यश्री कृष्णा परब

कु. भाग्यश्री कृष्णा परब



निसर्गाच्या रक्षणासाठी झटणारी दुर्गाशक्ती; कार्यकर्तृत्वातून जपतेय सृष्टीचा अनमोल वारसा!

पक्ष्यांप्रती जिव्हाळा, वन्यजीवांप्रती करुणा आणि संवर्धनाप्रती अढळ निष्ठा... एका जिद्दी कन्येची ध्येयसमर्पित वाटचाल!


स्काय न्यूज टुडे | राहुल जाधव :
प्रत्येक स्त्रीच्या अंतरंगात एक आदिशक्ती वास करते. तिच्या कर्तृत्वात सृजनाची ताकद असते, जिद्दीत अशक्याला शक्य करण्याचे सामर्थ्य असते, तर संघर्षाच्या वाटेवरून मार्गक्रमण करताना तिच्या आत्मविश्वासाला अनुभवांची भक्कम जोड मिळत असते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, संकटांनी कितीही घेरले, तरी मनातील स्वप्नांवर विश्वास ठेवून पुढे जाणारी स्त्री स्वतःचे आयुष्य घडविण्याबरोबरच अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरते. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात अशाच कर्तृत्ववान स्त्रियांच्या संघर्षमय प्रवासाला, त्यांच्या जिद्दीला आणि समाजासाठीच्या योगदानाला मानाचा मुजरा करणारे ‘स्काय न्यूज टुडे’चे विशेष सदर म्हणजे ‘नवदुर्गा : कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दुर्गा!’

या विशेष सदरातून समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र मुद्रा उमटविणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाची वाट निर्माण करणाऱ्या आणि नव्या पिढीसमोर आदर्श ठेवणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. याच प्रेरणादायी वाटचालीतील एक आश्वासक नाव म्हणजे सिंधुदुर्ग ओरोस रानबांबुळी येथील कु.भाग्यश्री कृष्णा परब!
प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती असते… परिस्थितीशी दोन हात करण्याची, स्वतःची वाट स्वतः निर्माण करण्याची आणि आपल्या कर्तृत्वातून इतरांसाठी प्रेरणादायी ठरण्याची. तसेच आपल्या सामाजिक कार्यातून आदर्श निर्माण करण्याची. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नवदुर्गेच्या विविध रूपांना वंदन करत असताना, आपल्या आजूबाजूला निसर्ग, वन्यजीव आणि समाजासाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्या अशाच एका तरुण स्त्रीशक्तीची कहाणी समोर येते. सिंधुदुर्गच्या मातीत वाढलेल्या भाग्यश्री परब यांचे निसर्गाशी असलेले नाते आजचे नाही, तर त्यांच्या बालपणापासूनचे आहे. त्यांच्या घरातच वन आणि निसर्गाशी जोडलेली एक समृद्ध पार्श्वभूमी होती. त्यांचे वडील वनरक्षक म्हणून वनविभागात कार्यरत होते, तर आजोबांनीही काही काळ वनविभागात सेवा बजावली होती. त्यामुळे जंगल, डोंगर, झाडे, पक्षी आणि वन्यजीव हे भाग्यश्री साठी कधीच अपरिचित नव्हते.
मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या की गावाकडे जाणे, डोंगर चढणे, एका गावातून दुसऱ्या गावात जंगलवाटेने फिरणे आणि वाटेत दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल वडिलांना प्रश्न विचारणे, त्यांच्याकडून माहिती जाणून घेणे, हे त्यांच्या बालपणाचा अविभाज्य भाग होते. चौकस नजर आणि प्रश्न विचारण्याची सवय याच काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनली. नकळत निसर्ग त्यांचा पहिला शिक्षक झाला आणि वडील त्यांचे पहिले मार्गदर्शक. भाग्यश्री यांचे प्राथमिक शिक्षण ओरोस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर पणदूर येथील शिवाजी इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. शालेय जीवनातच त्यांच्या अंगातील विविध कलागुणांना शिक्षकांनी भरभरून वाव दिला. गायन, नृत्य, रांगोळी, विविध स्पर्धा आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्या नेहमीच उत्साहाने सहभागी होत. केवळ सहभागच नव्हे, तर अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी यशही मिळवले. शिक्षणातही त्या सातत्याने पहिल्या तीन क्रमांकांमध्ये राहिल्या. बारावीच्या विज्ञान शाखेतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

पुढे संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे त्यांनी प्राणीशास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. याच काळात त्यांच्या मनात लहानपणापासून रुजलेले निसर्गप्रेम एका नव्या दिशेने पुढे जाऊ लागले. निसर्गाच्या सान्निध्यात वावरताना पक्ष्यांकडे त्यांचे विशेष लक्ष वेधले गेले आणि पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली. त्यानंतर हातात कॅमेरा आला आणि पक्षी निरीक्षणाला छायाचित्रणाची जोड मिळाली.पक्ष्यांचे केवळ सुंदर फोटो काढणे एवढ्यावर भाग्यश्री थांबल्या नाहीत. प्रत्येक पक्ष्याचे नाव काय? त्याचे अधिवास कोणते? तो काय खातो? त्याचे वर्तन कसे असते? त्याच्या जीवनपद्धतीमध्ये ऋतूनुसार काय बदल होतात? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याची त्यांची जिज्ञासा वाढत गेली. पक्षी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद होत होते आणि त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासातही उतरू लागले.
पक्ष्यांच्या छायाचित्रणातून आणि अभ्यासातून मिळालेल्या अनुभवाला शास्त्रीय स्वरूप देण्याचा विचार त्यांच्या मनात आकार घेत होता. महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. कोळी यांच्या मार्गदर्शनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष्यांची माहिती संकलित करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. त्यातून सिंधुदुर्गातील पक्षीवैविध्याचा परिचय करून देणारे, २४७ पक्षी प्रजातींची छायाचित्रांसह माहिती देणारे “Bird Life of Sindhudurg” हे पुस्तक २०१९ मध्ये प्रकाशित झाले.
वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी स्वतःचे पहिले पुस्तक प्रकाशित होणे ही भाग्यश्री यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची कामगिरी ठरली. एका तरुण मुलीने छायाचित्रणाच्या छंदाला अभ्यासाची जोड देत आपल्या जिल्ह्यातील पक्षीवैविध्य सर्वांसमोर आणण्याचा केलेला हा प्रयत्न निश्चितच वेगळा होता.
पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच त्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडेही वळला. वनविभागाशी संबंधित विविध परीक्षा देत असतानाच पक्ष्यांवरील सात-आठ वर्षांच्या निरीक्षणाला अधिक शास्त्रीय दिशा देण्याची गरज त्यांना जाणवली. पक्षी दिसतात एवढेच नव्हे, तर ते कसे जगतात, त्यांचे सामाजिक आणि प्रजननवर्तन कसे असते, त्यांच्या अधिवासाचा त्यांच्या वर्तनावर कसा परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा निर्माण झाली. आणि याच इच्छेतून त्यांनी पीएच.डी. करण्याचा निर्णय घेतला.
सहाय्यक प्राध्यापक डॉ. मंगेश जांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या त्या पक्ष्यांच्या वर्तनशास्त्रावर पीएच.डी.चे अंतिम वर्षाचे संशोधन करत आहेत. अशा प्रकारे छायाचित्रणातून सुरू झालेला पक्ष्यांचा परिचय आज वैज्ञानिक संशोधनापर्यंत पोहोचला आहे. मात्र भाग्यश्री यांच्यासाठी निसर्गसंवर्धन म्हणजे केवळ संशोधन किंवा कॅमेऱ्यात पक्षी टिपणे नव्हे. निसर्गाशी असलेले नाते समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, विशेषतः पुढच्या पिढीला निसर्गाची ओळख झाली पाहिजे, असा त्यांचा ठाम प्रयत्न राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन पक्षी निरीक्षण, वन्यजीव संवर्धन, निसर्गभ्रमंती आणि ‘विंडो बर्डिंग’ याबाबत जनजागृती केली. लहान मुलांना पक्षी केवळ पुस्तकात किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर दिसू नयेत, तर त्यांच्या आजूबाजूच्या निसर्गात ते स्वतः अनुभवता यावेत, यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. निसर्गाशी मैत्री करण्याची सुरुवात लहान वयात झाली, तर संवर्धनाची जाणीव आयुष्यभर टिकते, या विचारातून त्यांचे काम सातत्याने सुरू आहे.


उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या पक्ष्यांसाठी गेल्या चार वर्षांपासून त्या मातीच्या पाण्याच्या भांड्यांचे मोफत वाटप करत आहेत. पक्ष्यांसाठी पाण्याची छोटीशी सोय हीदेखील त्यांच्या जगण्यासाठी किती महत्त्वाची ठरू शकते, याची जाणीव समाजात निर्माण करण्याचा हा साधा पण प्रभावी प्रयत्न आहे. वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा, निसर्गभ्रमंती, जनजागृती आणि वन्यजीव बचावकार्य अशा विविध माध्यमातून त्यांचे संवर्धनकार्य सुरूच आहे.
पक्षी आणि निसर्गाच्या अभ्यासातून सुरू झालेली त्यांची वाटचाल आता प्रत्यक्ष वन्यजीव बचावकार्यापर्यंत पोहोचली आहे. सापांना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे, संकटात सापडलेल्या घोरपड, बिबट्या, धनेश, शेकरू यांसारख्या वन्यजीवांच्या बचावासाठी स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाच्या सहकार्याने काम करणे, अशा विविध उपक्रमांमध्ये त्या सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत. संशोधनाच्या माध्यमातून वन्यजीव समजून घेणाऱ्या भाग्यश्री आता प्रत्यक्ष क्षेत्रात त्यांच्या संरक्षणासाठीही काम करत आहेत.
आणि मग २०२६ हे वर्ष त्यांच्या या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा घेऊन आले. महाराष्ट्र शासनाने त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती केली. ज्यांच्यासाठी जंगल बालपणापासून घरासारखे होते, ज्यांनी पक्ष्यांना कॅमेऱ्यातून पाहिले, पुस्तकातून त्यांचा अभ्यास केला, संशोधनातून त्यांचे वर्तन समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्यक्ष क्षेत्रात वन्यजीवांसाठी काम केले—त्यांच्यासाठी ही नियुक्ती केवळ एका पदाची प्राप्ती नाही, तर वर्षानुवर्षे जोपासलेल्या निसर्गप्रेमाला मिळालेली एक मोठी जबाबदारी आहे.
भाग्यश्री यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, “माझा छंद आता जबाबदारीमध्ये बदलला आहे.” पक्षी आणि प्राण्यांचा केवळ अभ्यास करण्यापेक्षा त्यांच्या अधिक जवळ जाऊन, त्यांच्या अस्तित्वासाठी प्रत्यक्ष काम करण्याची संधी त्यांना या जबाबदारीमुळे मिळाली आहे. सिंधुदुर्गमध्ये मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक म्हणून मिळालेली ही ओळख त्यांच्या वैयक्तिक यशापेक्षा मोठ्या अर्थाने पाहिली जाते. कारण भाग्यश्रींसाठी हे पद केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण झाल्याची खूण नाही; तर निसर्गाच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या असंख्य महिलांसाठी उघडलेले एक दार आहे. आजही अनेक मुलींना जंगलात जायचे असते, पक्षी पाहायचे असतात, कॅमेरा हातात घ्यायचा असतो, वन्यजीवांचा अभ्यास करायचा असतो; पण “हे क्षेत्र महिलांसाठी आहे का?” हा प्रश्न त्यांच्या मनात कुठेतरी असतो. भाग्यश्रींचा प्रवास त्या प्रश्नाला कृतीतून उत्तर देतो.
“निसर्गाच्या वाटेवर चालण्यासाठी धाडस लागते, पण त्या वाटेवर एखादी स्त्री पुढे चालू लागली की तिच्या पावलांमागे अनेक पावले उमटू लागतात,” हा त्यांच्या प्रवासाचा अर्थ सांगणारा विचार ठरावा. आज भाग्यश्री परब स्वतःसाठी नव्हे, तर अशा अनेक मुलींसाठी आणि महिलांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त करतात ज्यांना निसर्गाशी जोडले जाऊन संवर्धनाच्या क्षेत्रात आपले योगदान द्यायचे आहे. त्यांच्या मते, वन्यजीव संवर्धन ही केवळ काही व्यक्तींची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे आणि या कामात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

वडिलांच्या वनरक्षकाच्या पावलांवर पाऊल ठेवत जंगलाशी जुळलेले नाते, हातात घेतलेल्या कॅमेऱ्यातून टिपलेले पक्षी, वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रकाशित झालेले पुस्तक, वैज्ञानिक संशोधनाची वाटचाल, मुलांमध्ये निर्माण केलेली निसर्गाची आवड, पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात ठेवलेले मातीचे पाणवठे, संकटात सापडलेल्या वन्यजीवांसाठी केलेले बचावकार्य आणि आता महाराष्ट्र शासनाने सोपवलेली मानद वन्यजीव रक्षकाची जबाबदारी—या प्रत्येक टप्प्यात भाग्यश्री परब यांच्या जिद्दीची आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचीच झलक दिसते.
त्यांचा हा प्रवास एका मुलीपासून संशोधक होण्याचा, पक्षीप्रेमीपासून संवर्धक होण्याचा आणि संवर्धकापासून जबाबदार वन्यजीव रक्षक होण्याचा आहे.
नवरात्राच्या या पवित्र पर्वावर स्त्रीशक्तीला वंदन करताना भाग्यश्री परब यांची कहाणी एका वेगळ्या अर्थाने प्रेरणादायी ठरते. कारण देवीची शक्ती केवळ पूजेत नसते; ती एखाद्या मुलीच्या स्वप्नात, तिच्या जिद्दीत, तिच्या कष्टात आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या तिच्या ध्यासातही असते. आज भाग्यश्री परब यांच्या डोक्यावर मानद वन्यजीव रक्षकाची जबाबदारी आहे; पण त्यांच्या मनात मात्र अजूनही तोच बालपणीचा प्रश्न आहे—“या जंगलात अजून काय आहे?”
त्या प्रश्नांची उत्तरे शोधत त्यांची निसर्गयात्रा पुढेही अशीच सुरू राहो, त्यांच्या कार्यातून आणखी अनेक तरुणी निसर्गसंवर्धनाच्या क्षेत्रात पुढे येवोत आणि सिंधुदुर्गच्या निसर्गसंपदेच्या संरक्षणासाठी एक नवी महिला शक्ती उभी राहो, हीच अपेक्षा.
कु. भाग्यश्री कृष्णा परब यांच्या जिद्दीला, त्यांच्या निसर्गप्रेमाला आणि वन्यजीव संवर्धनासाठीच्या समर्पणाला मनःपूर्वक सलाम! “निसर्ग माझ्यासाठी केवळ अभ्यासाचा विषय नाही; तो माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. आणि त्याचे रक्षण करण्याची संधी मिळणे, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी आहे.” संघर्षातून स्वावलंबनाकडे, स्वावलंबनातून सेवेकडे आणि सेवेतून समाजविश्वासाकडे वाटचाल करणाऱ्या कु. भाग्यश्री परब या खऱ्या अर्थाने ‘नवदुर्गा’ सदरातील कर्तृत्वाचा गौरव ठरणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.

भाग्यश्री परब यांच्या आजवरच्या कार्याला आणि भविष्यातील पुढील वाटचालीला ‘स्काय न्यूज टुडे’ डिजिटल मीडिया परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

▪️ अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

ruchira top