Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सौ. जयश्री विशाल राजमाने : कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दुर्गा

सौ. जयश्री विशाल राजमाने  : कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दुर्गा



कोरडवाहू शेतीच्या मातीत रुजले स्वप्न; जिद्दीने घेतली उंच भरारी!

पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सौ. जयश्री विशाल राजमाने यांचा प्रेरणादायी प्रवास

स्काय न्यूज टुडे | मंगेश नलावडे :
प्रत्येक स्त्रीच्या अंतरंगात एक आदिशक्ती वास करते. तिच्या कर्तृत्वात सृजनाचे सामर्थ्य असते, जिद्दीत अशक्याला शक्य करण्याची ताकद असते आणि संघर्षाच्या प्रत्येक वळणावर स्वतःला नव्याने सिद्ध करण्याची अदम्य इच्छाशक्ती असते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, आर्थिक अडचणी कितीही गंभीर असल्या, तरी स्वप्नांवर अढळ विश्वास ठेवून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारी स्त्री केवळ स्वतःचे भविष्य घडवत नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याला नवी दिशा देते. तिचे यश हे तिच्या कष्टांचे फलित असते आणि तिचा प्रवास असंख्य जिद्दी मनांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरतो.

नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात अशाच कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाला, त्यांच्या आत्मविश्वासाला आणि समाजासाठीच्या योगदानाला अभिवादन करणारे ‘स्काय न्यूज टुडे’चे विशेष सदर म्हणजे ‘नवदुर्गा : कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दुर्गा!’

या विशेष सदरातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या, आत्मनिर्भरतेच्या बळावर यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या आणि आपल्या कार्यातून समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येत आहे. याच कर्तृत्वशाली वाटचालीतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील शेडोळ गावच्या कन्या आणि सध्या मालवण तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ. जयश्री विशाल राजमाने !

कोरडवाहू शेतीच्या मातीत रुजले स्वप्न; जिद्दीने घेतली उंच भरारी!

लातूर जिल्ह्यातील शेडोळ या गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जयश्री यांचे बालपण गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, शेडोळ येथे, तर माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र विद्यालय, शेडोळ येथे झाले. लहानपणापासूनच अभ्यासाची आवड आणि काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचा त्यांनी निर्धार केला. घरच्यांकडे आग्रह धरून त्यांनी लातूर येथील जयक्रांती महाविद्यालयात अकरावी आणि बारावीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र, स्वप्नांचा हा प्रवास आर्थिकदृष्ट्या सहजसाध्य नव्हता. आई-वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. थोडीफार कोरडवाहू जमीन, दुष्काळजन्य परिस्थिती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी अशा आव्हानात्मक वातावरणात चारही भावंडांचे शिक्षण सुरू होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने प्रत्येक खर्चाचा विचार करावा लागत होता. अकरावीत कोणतेही खासगी क्लास न लावता अभ्यास करणाऱ्या जयश्री यांनी बारावीत दोन विषयांचे खासगी क्लास लावण्याचा आग्रह धरला. हे क्लास महाविद्यालयापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असल्याने रोज सहा किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. अखेर त्यांनी वडिलांकडे सायकलची मागणी केली. घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता तातडीने सायकल घेणे शक्य नव्हते; मात्र मुलीच्या शिक्षणाची तळमळ ओळखून वडिलांनी तीन महिन्यांनंतर जुनी सायकल आणून दिली. ही सायकल केवळ प्रवासाचे साधन नव्हती, तर त्यांच्या स्वप्नांकडे नेणाऱ्या वाटेवरील संघर्षाची साक्षीदार होती. परिस्थितीची जाणीव, कुटुंबाच्या कष्टांची जाणीव आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याची ओढ या बळावर त्यांनी बारावी विज्ञान शाखेत उल्लेखनीय यश संपादन केले.
पारंपरिक वाट सोडून कृषी क्षेत्राची निवड!

बारावीच्या काळातच जयश्री यांच्या कुटुंबासाठी आनंदाची बातमी आली. त्यांच्या मोठ्या बहिणीची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. बहिणीच्या यशाने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्याचवेळी जयश्री यांच्यासमोरही उच्च शिक्षण आणि करिअरची नवी दिशा निवडण्याचा प्रश्न होता. बारावीनंतर वैद्यकीय शिक्षणाच्या पारंपरिक वाटेऐवजी काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्यांच्या भावाने मांडला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासकीय सेवेत प्रवेश करण्याच्या ध्येयाने कृषी क्षेत्राची निवड करण्याचा सल्ला मिळाल्यानंतर जयश्री यांनी कृषी शिक्षणाकडे वाटचाल सुरू केली. त्यांना परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत लातूर येथील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळाला. या प्रवेशाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. केवळ पदवी मिळविणे एवढेच ध्येय न ठेवता कृषी क्षेत्रातील ज्ञान, संशोधन आणि शासकीय सेवेतून शेतकऱ्यांसाठी योगदान देण्याचा विचार त्यांच्या मनात अधिक दृढ होत गेला. या टप्प्यावर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मोठ्या भावाने आणि मोठ्या बहिणीने खंबीरपणे उचलली. स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून भावंडांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या कुटुंबीयांच्या पाठबळामुळे जयश्री यांना आपल्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करता आले.

संशोधनाची संधी, मेहनतीचे सुवर्णफळ!

कृषी जैवतंत्रज्ञानाच्या पदवी अभ्यासक्रमादरम्यान जयश्री यांनी अभ्यासात सातत्य राखले. तिसऱ्या वर्षात असताना त्यांची बंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठाच्या राष्ट्रीय संशोधन केंद्रात तीन महिन्यांसाठी फेलो म्हणून निवड झाली. तेथे भात पिकावरील संशोधनात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. ग्रामीण भागातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या विद्यार्थिनीला संशोधन क्षेत्रात मिळालेली ही संधी त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारी ठरली. प्रत्यक्ष संशोधनाचा अनुभव, कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड त्यांच्या अभ्यासाशी घातली गेली. चार वर्षांच्या अथक मेहनतीचे फलित म्हणून त्यांना विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले. हे सुवर्णपदक केवळ शैक्षणिक गुणवत्तेचे प्रतीक नव्हते, तर आर्थिक अडचणींवर मात करून स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या त्यांच्या जिद्दीचा गौरव होता. पदवीच्या यशावर समाधान न मानता त्यांनी पुढील शिक्षणासाठीही स्वतःला झोकून दिले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे ध्येय निश्चित करून त्यांनी सीईटी परीक्षेची कसून तयारी केली. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थिनींमधून प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. राहुरी येथे एम.एस्सी. ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत असतानाही त्यांनी अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लगेचच राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट (NET) उत्तीर्ण केली. प्रत्येक टप्प्यावर मिळणारे यश त्यांच्या आत्मविश्वासात भर घालत होते आणि मोठ्या ध्येयांकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देत होते.

कोरोनाच्या संकटातही न हरलेली जिद्द!

जयश्री यांच्या मोठ्या बहिणीची इच्छा होती की, जयश्री यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून जिल्हाधिकारी व्हावे. बहिणीच्या या स्वप्नाला स्वतःचे ध्येय मानत जयश्री यांनी पुण्यात यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी प्रवेश घेतला. या काळात त्यांनी अभ्यासासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. दररोज सुमारे १४ ते १५ तास अभ्यासिका आणि वर्गातील अभ्यासात व्यतीत करीत त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत होत्या. वेळेचे काटेकोर नियोजन, अभ्यासातील सातत्य आणि भविष्यातील मोठे स्वप्न यांची सांगड घालत त्यांनी कठोर परिश्रम सुरू ठेवले. मात्र, कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण जगाचेच चित्र बदलले. शैक्षणिक व्यवस्था विस्कळीत झाली आणि त्यांच्या तयारीच्या नियोजनावरही परिणाम झाला. अखेर त्यांना गावाकडे परतावे लागले. अशा वेळी अनेक जण परिस्थितीसमोर हतबल होतात; परंतु जयश्री यांनी संकटाला पूर्णविराम न मानता नव्या सुरुवातीची संधी म्हणून स्वीकारले. वाढते वय, कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आणि लवकरात लवकर शासकीय सेवेत रुजू होण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी उपलब्ध संधींचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्याच प्रयत्नात राजपत्रित अधिकारीपदाला गवसणी!

सातत्यपूर्ण अभ्यास, कृषी विषयातील सखोल ज्ञान आणि शासकीय सेवेत प्रवेश करण्याची प्रबळ इच्छाशक्ती यांच्या बळावर जयश्री यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा परीक्षेची तयारी केली. या परीक्षेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात मंडळ कृषी अधिकारी, गट-ब (राजपत्रित) पदावर निवड मिळविली. अनेक अडचणींवर मात करीत मिळविलेले हे यश त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरले. कोरडवाहू शेती, दुष्काळ आणि आर्थिक मर्यादा यांचा जवळून अनुभव घेतलेल्या जयश्री यांनी आता कृषी क्षेत्रातील शासकीय सेवेत प्रवेश केला होता. शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतीतील अनिश्चितता, पिकांचे प्रश्न आणि आर्थिक विवंचना यांची त्यांना केवळ पुस्तकी माहिती नव्हती, तर त्या परिस्थितीची प्रत्यक्ष जाणीव होती. त्यामुळे कृषी अधिकारी म्हणून काम करताना शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविणे, या जबाबदाऱ्यांना त्यांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. सध्या त्या मालवण तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असून, आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग कृषी क्षेत्रातील सेवेसाठी करीत आहेत.

पतीची खंबीर साथ; कर्तृत्वाला मिळाले नवे बळ!

यशस्वी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत कुटुंबाचे योगदान मोलाचे असते. जयश्री यांच्या बाबतीतही कुटुंबीयांचे पाठबळ त्यांच्या यशामागील महत्त्वाची ताकद ठरले आहे. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे कृषी क्षेत्रातच आयुष्यभर काम करण्याची त्यांची इच्छा होती. याच विचारातून त्यांनी विवाहासाठीही कृषी शिक्षण घेतलेल्या शेतकरी जोडीदाराची निवड केली. त्यांचे पती श्री. विशाल राजमाने हे त्यांच्या वाटचालीतील खंबीर आधार आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे जयश्री यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांची चिंता न करता शासकीय कर्तव्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येते. आपल्या कामात शंभर टक्के योगदान देता येण्यामागे पतीची साथ महत्त्वाची असल्याचे त्या आवर्जून सांगतात. स्त्रीच्या यशामागे अनेकदा तिच्या कुटुंबातील व्यक्तींचा त्याग, समजूतदारपणा आणि प्रोत्साहन दडलेले असते. जयश्री यांच्या प्रवासात त्यांच्या आई-वडिलांचे कष्ट, भावंडांचे सहकार्य आणि पतीची खंबीर साथ यांचा सुंदर संगम दिसून येतो.

एकाच कुटुंबात चार वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्व!

जयश्री यांच्या यशाची कहाणी केवळ त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वापुरती मर्यादित नाही. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही चारही मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांचा संघर्षही तितकाच प्रेरणादायी आहे. शेतीच्या मर्यादित उत्पन्नातून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविताना आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टांची जयश्री यांना पूर्ण जाणीव आहे. आपल्या मुलांनी शिक्षणाच्या बळावर स्वतःचे आयुष्य घडवावे, ही त्यांची अपेक्षा होती. आज चारही भावंडांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करून त्या अपेक्षांना सार्थ ठरविले आहे. जयश्री यांची मोठी बहीण सध्या नवी मुंबई येथे गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. दुसरी बहीण मुंबईतील शासकीय महाविद्यालयातून दंतवैद्यकीय शिक्षण पूर्ण करून स्वतःचे क्लिनिक चालवित आहे. त्यांचे मोठे बंधू एमबीए पदवीधर असून, ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने त्यांनी आपल्या गावी एलकेजी ते सातवीपर्यंतची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे.एकीकडे कायदा व सुव्यवस्थेच्या क्षेत्रातील सेवा, दुसरीकडे आरोग्यसेवा, तिसरीकडे कृषी क्षेत्रातील शासकीय जबाबदारी आणि चौथ्या बाजूला ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचा प्रयत्न—अशा विविध क्षेत्रांत या भावंडांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या यशामागे केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही, तर शिक्षणाबद्दलची निष्ठा, कुटुंबाचा त्याग आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना आहे. त्यामुळे दूधभाते कुटुंबाची ही वाटचाल ग्रामीण भागातील अनेक पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते.

जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न...

शासकीय सेवेत राजपत्रित अधिकारीपद मिळविल्यानंतरही जयश्री यांची महत्त्वाकांक्षा थांबलेली नाही. त्यांच्या मोठ्या बहिणीने पाहिलेले जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आजही त्यांच्या मनात जिवंत आहे. भविष्यात या ध्येयाच्या पूर्ततेसाठी पुन्हा प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस आहे. यश मिळाल्यानंतरही नव्या ध्येयांचा ध्यास कायम ठेवणे, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास राखणे आणि परिस्थितीनुसार मार्ग बदलला तरी ध्येयापासून दूर न जाणे, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या प्रवासातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—यशाचा मार्ग नेहमी सरळ नसतो. कधी आर्थिक अडचणी, कधी कौटुंबिक जबाबदाऱ्या, तर कधी अनपेक्षित संकटे वाट अडवतात. मात्र, ध्येय स्पष्ट असेल, मेहनतीची तयारी असेल आणि आपल्या माणसांची साथ लाभली असेल, तर प्रतिकूल परिस्थितीतूनही यशाचा मार्ग निर्माण करता येतो.


संघर्षाला सामर्थ्यात, शिक्षणाला कर्तृत्वात आणि सेवेला ध्येयात रूपांतरित करणारी ‘नवदुर्गा’!

शेडोळच्या मातीतून सुरू झालेला  पूर्वाश्रमीच्या कु.जयश्री गोरोबा दूधभाते ते सौ.जयश्री विशाल राजमाने  यांचा प्रवास आज मालवणमधील कृषी अधिकारीपदापर्यंत पोहोचला आहे. या प्रवासात जुनी सायकल, सहा किलोमीटरची पायपीट, आर्थिक अडचणी, संशोधनाची संधी, सुवर्णपदक, पदव्युत्तर शिक्षण, यूपीएससीची तयारी, कोरोनाचे संकट आणि अखेरीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यश असे अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यांच्या जीवनप्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अडचणीतून त्यांनी नवी शिकवण घेतली आणि प्रत्येक यशातून पुढील ध्येयाची प्रेरणा मिळविली. शेतकरी कुटुंबातील मुलगी म्हणून त्यांनी शेतीतील वास्तव जवळून अनुभवले; कृषी शिक्षणातून त्या अनुभवाला ज्ञानाची जोड दिली आणि शासकीय सेवेत प्रवेश करून समाजासाठी योगदान देण्याची संधी मिळविली. जिद्दीतून स्वप्नांना आकार देणारी, संघर्षातून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणारी आणि शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन कृषी सेवेला समर्पित झालेली सौ. जयश्री गोरोबा दूधभाते ही ग्रामीण भागातील मुलींसाठी आत्मविश्वासाचा आणि प्रेरणेचा दीपस्तंभ आहेत. त्यांची ही वाटचाल केवळ एका महिलेच्या यशाची कहाणी नाही; ती आई-वडिलांच्या त्यागाची, भावंडांच्या सहकार्याची, पतीच्या खंबीर पाठिंब्याची आणि शिक्षणाच्या सामर्थ्याची प्रेरणादायी गाथा आहे. म्हणूनच ‘नवदुर्गा : कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दुर्गा’ या विशेष सदरात त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे ही अभिमानाची बाब आहे.

सौ. जयश्री विशाल राजमाने यांच्या आजवरच्या उल्लेखनीय वाटचालीस आणि भविष्यातील उच्च ध्येयपूर्तीसाठी ‘स्काय न्यूज टुडे’ डिजिटल मीडिया परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

▪️ अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

ruchira top