घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर नवी संकल्पना जाहीर
२० ऑक्टोबर पूर्वी नामांकन पाठविण्याचे आवाहन
तळगावातील युवा उद्योजकांना मिळणार प्रोत्साहनाचे व्यासपीठ
मालवण | प्रतिनिधी : तळगावातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच नव्या पिढीला उद्योजकतेसाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने तळगाव गुणगौरव समितीने यंदा एक नवी संकल्पना जाहीर केली आहे. उद्योग व व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तळगावातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी समितीतर्फे दरवर्षी ‘तळगाव युवा उद्योजक’ (Talgaav Young Entrepreneur) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. घटस्थापना आणि नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर घोषणा करून देण्यात येणाऱ्या नव्या पुरस्कारा बाबत माहिती देण्यायत आली.
तळगाव गुणगौरव समितीतर्फे नुकताच सहाव्या ‘तळगाव भूषण’ पुरस्काराचा वितरण सोहळा तळगाव येथे दिमाखात पार पडला. या पुरस्काराला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि त्यातून समितीशी जोडली जाणारी तळगावातील मंडळी, विशेषतः तरुणांचा सहभाग, ही समितीसाठी प्रेरणादायी बाब ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवून युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
युवा उद्योजकांच्या कर्तृत्वाला मिळणार नवी ओळख
तळगावातील व्यक्तींनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने तळगाव गुणगौरव समितीची स्थापना करण्यात आली आहे. काळानुरूप नवनवीन संकल्पना राबवून समाजातील कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा समितीचा प्रयत्न असतो. याच विचारमंथनातून ‘तळगाव युवा उद्योजक’ पुरस्काराची संकल्पना पुढे आली आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात तरुणांनी नोकरीच्या संधींबरोबरच स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय उभारण्याकडेही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबन साधणाऱ्या तरुणांच्या कार्याची दखल घेतल्यास त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळेल, तसेच इतर तरुणांनाही व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. ही सामाजिक जाणीव आणि कर्तव्यभावना लक्षात घेऊन समितीने या पुरस्काराचा उपक्रम हाती घेतला आहे.
२० ऑक्टोबर पूर्वी नामांकन पाठविण्याचे आवाहन
तळगावातील उद्योग व व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असलेल्या पात्र युवा उद्योजकांची माहिती समितीपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांची नामांकने २० ऑक्टोबर २०२६ पूर्वी समितीच्या अधिकृत ई-मेलवर किंवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवावीत.
ई-मेल : talgaongungauravsamiti@gmail.com
संपर्कासाठी :
- श्री. सुनील बापू दळवी – 98929 83191
- श्री. सुभाष मातवणकर – 98692 23494
- श्री. अमोल आत्माराम दळवी – 9619581656
दिवाळीनंतर मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती तळगाव गुणगौरव समितीतर्फे देण्यात आली आहे.
तळगावातील युवा उद्योजकांच्या कर्तृत्वाला सन्मान देणारा आणि नव्या पिढीला स्वावलंबनाची प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच तळगाव गुणगौरव समितीने सर्व तळगाववासीयांना घटस्थापना व नवरात्रीच्या शुभेच्छा देत ‘जय अंबे, जय सातेरी’ असा भक्तिभावपूर्ण संदेश दिला आहे.
▪️अमित खोत | मालवण

तळगाव गुणगौरव समितीतर्फे ‘तळगाव युवा उद्योजक’ पुरस्काराची घोषणा!
