Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कु. मिनाक्षी मधुसूदन वेंगुर्लेकर : कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दुर्गा

कु. मिनाक्षी मधुसूदन वेंगुर्लेकर : कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दुर्गा

आरोग्यसेवा, सामाजिक कार्य आणि राजकारण अशा त्रिवेणी संगमातून घडला आदर्श व्यक्तिमत्वाचा प्रवास

स्काय न्यूज टुडे | मंगेश नलावडे :
प्रत्येक स्त्रीच्या अंतरंगात एक आदिशक्ती वास करते. तिच्या कर्तृत्वात सृजनाची ताकद असते, जिद्दीत अशक्याला शक्य करण्याचे सामर्थ्य असते, तर संघर्षाच्या वाटेवरून मार्गक्रमण करताना तिच्या आत्मविश्वासाला अनुभवांची भक्कम जोड मिळत असते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, संकटांनी कितीही घेरले, तरी मनातील स्वप्नांवर विश्वास ठेवून पुढे जाणारी स्त्री स्वतःचे आयुष्य घडविण्याबरोबरच अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरते. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात अशाच कर्तृत्ववान स्त्रियांच्या संघर्षमय प्रवासाला, त्यांच्या जिद्दीला आणि समाजासाठीच्या योगदानाला मानाचा मुजरा करणारे ‘स्काय न्यूज टुडे’चे विशेष सदर म्हणजे ‘नवदुर्गा : कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दुर्गा!’


या विशेष सदरातून समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र मुद्रा उमटविणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाची वाट निर्माण करणाऱ्या आणि नव्या पिढीसमोर आत्मनिर्भरतेचा आदर्श ठेवणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. याच प्रेरणादायी वाटचालीतील एक आश्वासक नाव म्हणजे कुडाळ तालुक्यातील तेंडोली-तळेवाडी येथील कु. मिनाक्षी मधुसूदन वेंगुर्लेकर!

आर्थिक अडचणी, संघर्षमय परिस्थिती, कष्टांची वाट आणि मनात जपलेली स्वप्ने… या साऱ्यांशी दोन हात करत मिनाक्षी यांनी स्वतःच्या मेहनतीच्या बळावर व्यावसायिक क्षेत्रात यश संपादन केले. आज त्या माड्याचीवाडी-रायवाडी येथे ‘लक्ष्मी अ‍ॅक्युप्रेशर’ (Laxmi Acunature) या नावाने फिजिओथेरपी सेंटर चालवित आहेत. गेल्या सहा वर्षांपासून रुग्णसेवेच्या माध्यमातून अनेकांना आरोग्यसेवा देण्याचे कार्य त्या करत आहेत. त्याचबरोबर तेंडोली ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून सार्वजनिक जीवनातही सक्रिय आहेत. आरोग्यसेवा, सामाजिक बांधिलकी आणि राजकीय सहभाग या तीनही क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मिनाक्षी यांचा प्रवास म्हणजे जिद्दीने उभ्या केलेल्या स्वप्नांची प्रेरणादायी कहाणी!

प्रतिकूल परिस्थितीतून घडले आत्मनिर्भरतेचे स्वप्न!
कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावात मिनाक्षी यांचे बालपण गेले. घरची परिस्थिती प्रतिकूल असतानाही शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्यांची जिद्द कायम होती. तेंडोली येथील शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कुडाळ हायस्कूलमध्ये अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेतले. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता. मात्र, समाजातील काही दानशूर व्यक्तींनी वेळोवेळी आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्या या सहकार्यामुळेच शिक्षण पूर्ण करण्याच्या वाटेवर पुढे जाता आले, अशी कृतज्ञ भावना मिनाक्षी व्यक्त करतात. आपल्या आयुष्यात मदतीचा हात देणाऱ्या व्यक्तींचे योगदान त्या आजही विसरलेल्या नाहीत. कारण संघर्षाच्या काळात मिळालेली छोटीशी मदतही एखाद्याच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते, याची त्यांना जाणीव आहे. याच अनुभवातून समाजाप्रती कृतज्ञता आणि शक्य होईल तशी इतरांना मदत करण्याची भावना त्यांच्या मनात रुजली. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ महिला होमगार्ड म्हणूनही सेवा बजावली. पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काम करताना शिस्त, जबाबदारी आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव त्यांना मिळाला. आयुष्याच्या या टप्प्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आत्मविश्वासाची जोड दिली.

आईच्या आजारपणातून सापडली सेवाकार्याची नवी दिशा!


मिनाक्षी यांच्या आयुष्यात फिजिओथेरपी क्षेत्राची ओळख एका भावनिक प्रसंगातून झाली. त्यांच्या आईची प्रकृती बरी नसल्याने तिला उपचारांसाठी कुडाळ येथे न्यावे लागत असे. यावेळी फिजिओथेरपीच्या माध्यमातून रुग्णांना दिली जाणारी सेवा, डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि उपचारांमुळे रुग्णांना मिळणारा दिलासा त्यांनी जवळून अनुभवला. या अनुभवातूनच त्यांच्या मनात फिजिओथेरपी क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली. रुग्णांची सेवा करण्याची इच्छा हळूहळू ध्येयात रूपांतरित झाली. याच प्रेरणेतून त्यांनी डॉ. साधना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिओथेरपी सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सुमारे दोन वर्षे काम करताना त्यांनी या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव आत्मसात केला. रुग्णांशी संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि उपचार प्रक्रियेत सहकार्य करणे, या अनुभवांतून त्यांची कौशल्ये विकसित होत गेली. रुग्णांना सेवा देताना त्यांच्याकडून मिळणारे समाधानाचे शब्द आणि प्रोत्साहन मिनाक्षी यांच्यासाठी मोठी प्रेरणा ठरले. अनेक रुग्ण त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला देत असत. मात्र, स्वतःचे सेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नव्हते. मनात इच्छा प्रबळ होती; पण परिस्थितीची मर्यादा त्यांना जाणवत होती. तरीही त्यांनी हार मानली नाही. या प्रवासात शारीरिक कष्ट आणि अनेक अडचणी सहन कराव्या लागल्या. मात्र, वडिलांनी दिलेली शिकवण त्यांना नेहमीच बळ देत राहिली. यश मिळवायचे असेल, तर कष्टांची तयारी ठेवावीच लागते, हा विचार मनाशी घट्ट धरून त्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. या प्रवासात डॉ. साधना चव्हाण यांनी दिलेले मार्गदर्शन आणि संधी यांचे ऋण आपण कधीही विसरणार नाही, असे मिनाक्षी आवर्जून सांगतात.

मदतीच्या हातांनी दिले स्वप्नांना बळ!

अनुभवाच्या जोरावर स्वतःचे काहीतरी उभे करण्याची इच्छा अधिकच प्रबळ होत असताना तेंडोली गावातील अ‍ॅड. अनघा तेंडोलकर आणि त्यांचे पती अरविंद तेंडोलकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली. पुढील शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मिळालेल्या या मदतीमुळे मिनाक्षी यांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळाली. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे जाऊन अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि फिजिओथेरपीशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केला. या टप्प्यावर पौर्णिमा खानोलकर यांचीही मोलाची साथ लाभली. आर्थिक अडचणींवर मात करत, अनुभव आणि प्रशिक्षणाच्या बळावर त्यांनी स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची तयारी पूर्ण केली. आज या प्रयत्नांचे फलित त्यांच्या स्वतःच्या फिजिओथेरपी सेंटरच्या रूपाने दिसून येते. माड्याचीवाडी-रायवाडी येथे गेल्या सहा वर्षांपासून ‘लक्ष्मी अ‍ॅक्युप्रेशर’ या नावाने त्या सेंटर चालवत आहेत. स्वतःचा व्यवसाय उभारणे, तो सातत्याने सुरू ठेवणे आणि रुग्णांशी विश्वासाचे नाते निर्माण करणे, ही त्यांच्या प्रवासातील महत्त्वाची यशस्वी पावले आहेत. एका सामान्य कुटुंबातील मुलीने आर्थिक मर्यादांवर मात करून स्वतःच्या कष्टांवर उभे राहणे, हेच त्यांच्या कर्तृत्वाचे खरे वैशिष्ट्य आहे. परिस्थितीने अडविण्याचा प्रयत्न केला, तरी ध्येयापासून दूर न जाता सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास मार्ग नक्की सापडतो, याचे उदाहरण मिनाक्षी यांच्या वाटचालीतून समोर येते.

आरोग्यसेवेतून जपली समाजाप्रती बांधिलकी!


फिजिओथेरपी सेंटर चालविणे हा मिनाक्षी यांच्यासाठी केवळ व्यवसाय नाही, तर रुग्णांना मदत करण्याची आणि समाजाशी जोडलेले राहण्याची संधीही आहे. रुग्णांना सेवा देताना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समाधान त्यांना पुढील कामासाठी ऊर्जा देते. आपल्या हातून रुग्णांना दिलासा मिळणे ही परमेश्वराने दिलेली देणगी असल्याची भावना त्या व्यक्त करतात. व्यावसायिक यशासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जनसेवेतून मिळणारे आशीर्वाद हे आपल्यासाठी अनमोल आहेत, असे त्या मानतात. समाजातील व्यक्तींनी आपल्याला कठीण काळात साथ दिली; त्यामुळे समाजासाठीही आपल्याला काहीतरी करता आले पाहिजे, ही भावना त्यांच्या कार्यामागे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःचा व्यवसाय सांभाळत सामाजिक कार्यासाठी वेळ देणे सोपे नाही. मात्र, मिनाक्षी यांनी या दोन्ही जबाबदाऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या वाटचालीतून व्यावसायिक प्रगती आणि सामाजिक संवेदनशीलता यांची सांगड घालता येते, हा महत्त्वाचा संदेश मिळतो.

ग्रामपंचायत सदस्य म्हणून जनसेवेचा नवा अध्याय!

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करत असतानाच मिनाक्षी यांना सार्वजनिक जीवनातही काम करण्याची संधी मिळाली. तेंडोली ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर गावाच्या विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची नवी जबाबदारी त्यांच्यावर आली. ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून मिळालेली संधी ही केवळ पद नसून गावातील नागरिकांच्या अपेक्षा आणि समस्या समजून घेऊन त्यांच्यासाठी काम करण्याची जबाबदारी आहे, याची त्यांना जाणीव आहे. व्यवसायातून स्वावलंबन आणि सार्वजनिक जीवनातून जनसेवा, अशा दोन्ही आघाड्यांवर कार्यरत राहण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू अधोरेखित करतो. महिलांनी केवळ एका क्षेत्रापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता, आपल्या क्षमतेनुसार विविध क्षेत्रांत योगदान द्यावे, ही त्यांची वाटचाल सांगून जाते.

आईच्या आठवणींतून मिळते पुढे जाण्याची प्रेरणा!

मिनाक्षी यांच्या यशस्वी प्रवासामागे अनेक व्यक्तींचे योगदान असले, तरी त्यांच्या मनातील सर्वांत जिव्हाळ्याचे स्थान त्यांच्या आईचे आहे. आईच्या आजारपणातूनच फिजिओथेरपी क्षेत्राची ओळख झाली आणि याच क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. मात्र, आज सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात वाटचाल करताना आई आपल्या सोबत नाही, ही खंत त्यांच्या मनात कायम आहे. वर्षभरापूर्वी आईचे निधन झाले. आईने दिलेले प्रेम, संस्कार आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी यांमुळेच आपण या टप्प्यापर्यंत पोहोचू शकलो, अशी त्यांची भावना आहे. आईचे ऋण कधीही फेडता येणार नाही, असे त्या भावूकपणे सांगतात. आईच्या निधनानंतर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी, मैत्रिणीप्रमाणे साथ देणारी त्यांची वहिनी सौ. लावण्या वेंगुर्लेकर यांचे योगदानही महत्त्वाचे आहे. कौटुंबिक पातळीवर मिळणारा हा आधार त्यांना प्रत्येक जबाबदारी पार पाडण्यासाठी बळ देतो. वडील, भाऊ, नातेवाईक यांच्यासह शैलेश नाईक, सुदत्त ठाकूर आणि इतर दानशूर व्यक्तींनी वेळोवेळी दिलेली साथही त्यांच्या प्रवासात मोलाची ठरली आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण आज यशस्वी फिजिओथेरपी व्यावसायिक म्हणून उभे राहू शकलो, अशी कृतज्ञता मिनाक्षी व्यक्त करतात.

नव्या पिढीने स्वावलंबनाचा मार्ग निवडावा!

स्वतःच्या आयुष्यातील संघर्षातून अनुभव घेतलेल्या मिनाक्षी यांना आजच्या युवा पिढीला एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे. तरुण-तरुणींनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे, कौशल्ये आत्मसात करावीत आणि स्वतःच्या हक्काचा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहावे, असे त्या सांगतात. केवळ नोकरीच्या संधींच्या प्रतीक्षेत न राहता, उपलब्ध कौशल्ये आणि क्षमतांच्या आधारे रोजगारनिर्मितीचा मार्गही निवडता येतो. त्यासाठी मेहनत, संयम, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यांची आवश्यकता असते. सुरुवातीला आर्थिक अडचणी असल्या, तरी प्रयत्नांची दिशा योग्य असेल आणि ध्येयाप्रती प्रामाणिकपणा असेल, तर यशाचा मार्ग निर्माण करता येतो, हा विश्वास त्यांच्या जीवनप्रवासातून दिसून येतो. मिनाक्षी यांची कथा ही केवळ एका महिलेने स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याची कहाणी नाही. ती आहे प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या जिद्दीची, मदतीच्या हातांचे ऋण जपणाऱ्या कृतज्ञतेची, आईच्या आठवणींना प्रेरणेत रूपांतरित करणाऱ्या भावविश्वाची आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा मनात बाळगणाऱ्या संवेदनशीलतेची!

कष्टांना आत्मविश्वासाची जोड, सेवेला माणुसकीची किनार!

तेंडोलीच्या मातीतून सुरू झालेला मिनाक्षी वेंगुर्लेकर यांचा प्रवास आज आरोग्यसेवा, व्यवसाय आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रांत पुढे सरकत आहे. परिस्थितीने दिलेली आव्हाने त्यांनी आपल्या वाटचालीतील अडथळे न मानता अनुभवांची शिदोरी बनविली. समाजातील दानशूर व्यक्तींची मदत, मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचा आधार आणि स्वतःची मेहनत यांच्या बळावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. आज त्यांचे कार्य अनेक तरुणींना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देऊ शकते. कारण यश म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे; तर आपल्या पायावर उभे राहून समाजासाठी योगदान देणे, माणसांशी नाते जपणे आणि इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करणे, हेही यशाचे महत्त्वाचे पैलू आहेत.

संघर्षातून स्वावलंबनाकडे, स्वावलंबनातून सेवेकडे आणि सेवेतून समाजविश्वासाकडे वाटचाल करणाऱ्या कु. मिनाक्षी मधुसूदन वेंगुर्लेकर या खऱ्या अर्थाने ‘नवदुर्गा’ सदरातील कर्तृत्वाचा गौरव ठरणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या आजवरच्या कार्याला आणि भविष्यातील सामाजिक, राजकीय व व्यावसायिक वाटचालीला ‘स्काय न्यूज टुडे’ डिजिटल मीडिया परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

▪️ अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

ruchira top