जिद्द, धाडस अन् आत्मनिर्भरतेचा प्रेरणादायी प्रवास....
मालती (आकांक्षा) दत्ताराम पाटकर ; उच्चशिक्षित युवा उद्योजिका
⚜️ प्रत्येक स्त्रीच्या रूपात असते एक आदिशक्ती, तिच्या कर्तृत्वात असते सृजनाची ताकद, तर तिच्या जिद्दीत असते अशक्याला शक्य करण्याची सामर्थ्यशाली ऊर्जा! नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात सर्वत्र आदिशक्तीच्या नवदुर्गा रूपांचा जागर होत असताना, स्त्रीशक्तीच्या असामान्य कर्तृत्वाला आणि तिच्यातील असीम प्रतिभेला मानाचा मुजरा करण्याचा हा विशेष प्रयत्न… देवीच्या उत्सवाचे औचित्य साधत ‘स्काय न्यूज टुडे’ डिजिटल मीडिया टीमच्या वतीने ‘नवदुर्गा’ या विशेष सदरातून समाजाच्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या, संघर्षावर मात करून स्वकर्तृत्वाने यशाची शिखरे गाठणाऱ्या आणि नव्या पिढीसमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. स्त्रीशक्तीच्या या तेजस्वी प्रवासाला समर्पित असलेला हा शब्दसन्मान म्हणजे तिच्या जिद्दीला, आत्मविश्वासाला आणि कर्तृत्वाला केलेला कृतज्ञतापूर्वक प्रणाम!
आजच्या आधुनिक युगात असे एकही क्षेत्र उरलेले नाही, जिथे महिलांनी आपल्या बुद्धिमत्तेची, कौशल्याची आणि कर्तृत्वाची मोहोर उमटवलेली नाही. पारंपरिक चौकटी ओलांडत, आव्हानांना धैर्याने सामोरे जात आणि स्वप्नांना वास्तवात उतरविण्यासाठी अथक परिश्रम घेत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. याच कर्तृत्ववान स्त्रीशक्तीचे एक आश्वासक आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे मालती (आकांक्षा) दत्ताराम पाटकर! म्हापणच्या मातीत घडलेल्या या लेकीने मालवणमध्ये अमुल आईस्क्रीम पार्लर च्या माध्यमातून स्वबळावर सुरू केलेली वाटचाल केवळ तिच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेची कहाणी नाही, तर आत्मनिर्भरतेचा ध्यास घेणाऱ्या तरुणींसाठी दिशादर्शक आहे. स्वतःच्या क्षमतेवर अढळ विश्वास ठेवत, मेहनतीच्या बळावर आणि जिद्दीच्या जोरावर उद्योजकतेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तिने सुरू केलेला हा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे. परिस्थितीपेक्षा संकल्पशक्ती मोठी असते आणि संधीची वाट पाहण्यापेक्षा स्वतः संधी निर्माण करण्याची वृत्तीच यशाचा मार्ग प्रशस्त करते, याची प्रचिती मालती यांच्या या वाटचालीतून येते. तिचे कर्तृत्व म्हणजे स्वप्नांना ध्येयाची जोड देणाऱ्या आणि ध्येयपूर्तीसाठी धाडसाने पुढे सरसावणाऱ्या नव्या स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी प्रतिबिंब होय.
स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धाडस, जिद्द आणि आत्मविश्वासाची गरज असते. समाज काय म्हणेल, अपयश आले तर काय होईल, अशा प्रश्नांचा विचार करत अनेक जण आपल्या इच्छांना मुरड घालतात. मात्र, वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी स्वतःच्या स्वप्नांना प्राधान्य देत मालती (आकांक्षा) पाटकर यांनी उद्योजकतेची वाट निवडली आहे.
मूळ म्हापण, ता. वेंगुर्ला येथील मालती यांनी मुंबई सांताक्रूझ येथील एसएनडीटी विद्यापीठातून बी.एस्सी. डायटिशियनचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर रुग्णालयात नोकरी अथवा क्लिनिक अशी संधी असतानाही त्यांनी स्वतःचा वेगळा व्यवसाय आपल्या सिंधुदुर्गच्या भूमीत सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज मालवणमध्ये अमूल आईस्क्रीम शॉपच्या माध्यमातून त्या स्वावलंबनाच्या दिशेने उद्योग क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकत आहेत.
शिक्षणानंतर निवडली स्वतःची वाट!
उच्च शिक्षण, चांगली नोकरी संधी यातून नियमित उत्पन्न आणि सुरक्षित भविष्याचा पर्याय उपलब्ध असतानाही मालती यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न होते. दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्याऐवजी स्वतःच्या कर्तृत्वावर ओळख निर्माण करण्याची त्यांची इच्छा होती. यशाची नेमकी खात्री नसतानाही त्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केले. विशेष म्हणजे, अमुल आईस्क्रीम पार्लर उद्घाटनाच्या अवघ्या दोन दिवस आधी त्यांनी घरच्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्याऐवजी व्यवसाय सुरू केल्याचे ऐकून घरच्यांनाही आश्चर्य वाटले. मात्र, मालती यांनी मनाशी ठरवलेले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला. म्हापण येथे वडिल दत्ताराम पाटकर यांचा चिवडा व्यवसाय व आई दर्शना पाटकर यांचा हॉटेल व्यवसाय अगदी जवळून बघत तसेच काही वेळा आई वडिलांना व्यवसायात मदत करत शिक्षण घेत मोठया झालेल्या मालती यांनी निवडलेला हा मार्ग आई वडिलांच्या व्यवसायातून प्रेरणा घेत निवडला आणि त्यात यशस्वी ही ठरत आहेत. नव्या क्षेत्रात आई वडिलांचे आशीर्वाद मिळतं आहेतच त्या सोबत मोठया भावाचा पाठिंबा हे सर्व आपल्यासाठी बळ देणारे ठरत असल्याचे मालती सांगतात.
स्वप्नांना महत्त्व!
“एवढे शिक्षण घेऊन आईस्क्रीमचा व्यवसाय का करायचा?” असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. मात्र, कोणता व्यवसाय करायचा, यापेक्षा तो स्वतःच्या मेहनतीने उभा करण्याची तयारी अधिक महत्त्वाची आहे, हे मालती यांच्या निर्णयातून दिसून येते.
व्यवसायाच्या सुरुवातीला रात्री कधी कधी पूर्ण आवरे पर्यत साडेबारा ते एक वाजेपर्यंत काम करावे लागते. दिवसभराचा थकवा, भविष्याचा वेध आणि मनातील अनेक प्रश्न असूनही कधी मागे यावे असे वाटले नाही. कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ विचार करून चालत नाही; त्यासाठी कृती करावी लागते, याची जाणीव त्यांना आहे.
जिद्दीतून स्वावलंबनाकडे!
महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ मोठ्या पदांवर पोहोचणे नव्हे, तर स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणे, आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करणे आणि स्वतःच्या क्षमतेला संधी देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. मालती पाटकर यांचा उद्योजकतेचा प्रवास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पुढे अधिक यश, काही आव्हाने आणि अनुभवाची शिदोरी त्यांच्यासोबत असेल. मात्र, स्वतःचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी उचललेले पहिले पाऊल अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी निश्चितच आहे.
म्हापणच्या मातीतून आलेल्या या तरुणीने मालवणमध्ये व्यवसाय सुरू करून स्वतःच्या कर्तृत्वाची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तिची कहाणी सांगते की, प्रत्येक स्वप्नासाठी मोठ्या संधीची वाट पाहण्याची गरज नसते; कधी कधी स्वतःवर विश्वास ठेवून केलेली सुरुवातच आयुष्याला नवी दिशा देते. मालती यांची ही कहाणी केवळ आईस्क्रीम शॉपची नाही, तर स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या एका भविष्यातील यशस्वी उद्योजीकेची आहे. हीच खरी नवदुर्गा—लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय करू शकतो, यावर विश्वास ठेवून स्वतःची ओळख घडवणारी! मालती (आकांक्षा) दत्ताराम पाटकर यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!
▪️अमित खोत | मालवण

म्हापणच्या लेकीची मालवणमध्ये यशस्वी उद्योजकीय वाटचाल!
