बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या पाहणीत प्रकार उघड
सांडपाणी तत्काळ बंद करण्याचे प्रशासनाचे आदेश : अन्यथा दंडात्मक व कायदेशीर कारवाई
राहुल जाधव | प्रतिनिधी : मालवण शहरातील चिवला बीच परिसरात समुद्रकिनारी सांडपाणी सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी परिसराची पाहणी केली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यात आला. समुद्रात सांडपाणी सोडणाऱ्या हॉटेलवर कारवाईची नोटीस बजावन्यात आली आहे. सांडपाणी सोडण्याचा प्रकार तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अन्यथा दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सुमारे ५० लाख रुपयांच्या निधीतून मालवणमध्ये काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व आरोग्य सभापती पूनम चव्हाण चिवला बीच परिसरात गेले होते. यावेळी काही हॉटेलमधून सांडपाणी थेट समुद्रकिनारी सोडले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेला बाधा आणणाऱ्या या प्रकाराची त्यांनी तातडीने दखल घेत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर संबंधित ठिकाणी पंचनामा करण्यात आला.
या पाहणीदरम्यान एका ठिकाणी बंधारा बांधकामाचा काही भाग तोडण्यात आल्याची बाबही समोर आली. त्यामुळे परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
दोन हॉटेलवर कारवाई
चिवला बीच परिसरात समुद्र किनारी सांडपाणी सोडल्याप्रकरणी दोन हॉटेल वर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच समुद्र किनारी सोडले जाणारे सांडपाणी तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समुद्रकिनाऱ्याचे पर्यावरण, स्वच्छता आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष दिले जाणार असल्याचे प्रशासनाच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, चिवला बीचपुरताच तपास मर्यादित न ठेवता शहरातील अन्य ठिकाणीही अशा प्रकारे सांडपाणी समुद्रात सोडले जात आहे का, याची तपासणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारांची माहिती समोर आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
काँक्रिटीकरणाच्या कामाचीही पाहणी
सांडपाणी प्रकरणाची दखल घेतल्यानंतर बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी परिसरातील सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाचीही पाहणी केली. कामाचा दर्जा चांगला राखून ते योग्य पद्धतीने पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित ठेकेदार व प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक निधीतून होणारी विकासकामे दर्जेदार आणि टिकाऊ झाली पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला.
▪️अमित खोत, मालवण

चिवला बीचवर समुद्रात सांडपाणी सोडणाऱ्या दोन हॉटेलवर कारवाईची नोटीस !
