पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोक सहभागातून उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : यावर्षी पावसाची मोठी तूट असल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्र समस्या भेडसावण्याची शक्यता लक्षात घेता देवली ग्रामपंचायतीने पुढाकार घेत देवली गावात लोकसहभागातून गेल्या दोन दिवसांत विविध वाड्यांमध्ये सात कच्चे व तीन पक्के असे १० वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देवली ग्रामपंचायतीने गावात एकूण २० वनराई बंधारे घालण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या मोहिमेचा प्रारंभ वरचीवाडी येथून ज्येष्ठ नागरिक भाई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या टप्प्यात 10 बंधारे उभारण्यात आले. तर उरलेले १० वनराई बंधारेदेखील लवकरच लोकसहभागातून पूर्ण केले जातील, अशी माहिती सरपंच श्याम वाक्कर यांनी दिली.
दोन दिवसांत वरचीवाडी, गव्हाणवाडी, खालचीवाडी आणि परबवाडी या चार वाड्यांमध्ये ग्रामस्थांच्या श्रमदानातून १० बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत.
या उपक्रमात गावातील सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याप्रसंगी सरपंच श्याम वाक्कर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सूरज बांगर, ग्रामपंचायत सदस्य सचिन मालवणकर, ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ घंटे, आरोग्य सहायक सुनील चव्हाण, संजय कडू, आरोग्य सेवक विठ्ठल गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष रामू चव्हाण, ज्येष्ठ नागरिक साबाजी परब,अंगणवाडी सेविका पुनम परब, मीनाक्षी चव्हाण, ग्रामसंघ अध्यक्ष संजना आचरेकर, सीआरपी दिक्षा देऊलकर बचतगट महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत श्रमदान करून बंधारे उभारणीचे काम पूर्ण केले.
कमी पावसामुळे विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. वनराई बंधाऱ्यांमुळे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरण्यास मदत होईल, ज्यामुळे भूजल पातळी वाढून ऐन उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता कमी होईल, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे. देवली ग्रामपंचायतीचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
▪️अमित खोत, मालवण

देवली गावात १० बंधाऱ्यांची उभारणी
