आचरा : आचरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने अखेर ताब्यात घेतले. बबन उर्फ भोंदू नागप्पा देसाई (रा. दुर्गादेवी गल्ली, जोयडा, रामनगर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 24/2024 अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम 326, 324, 323, 504 आणि 506 अंतर्गत 14 मे 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याची नोंद जिल्ह्यातील पाहिजे आरोपींच्या अभिलेखावर करण्यात आली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा त्याच्या मूळ पत्त्यासह संभाव्य ठिकाणी अनेकदा शोध घेतला. मात्र, आरोपी वारंवार वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा लागणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे निर्देश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपीच्या हालचालींचा माग काढण्यास सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषणासोबतच गोपनीय बातमीदारांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू ठेवला.
दरम्यान, आरोपी 6 ऑक्टोबर रोजी नातेवाईकांना भेटण्यासाठी बांदा परिसरात येणार असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे LCBच्या पथकाने बांदा परिसरात सापळा रचला. आरोपी तेथे पोहोचताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला आचरा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार, तसेच पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, पोलीस हेडकॉन्स्टेबल विल्सन डिसोजा (989) आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल आशिष जामदार (1082) यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेण्याची कारवाई यशस्वी केली.

पोलिसांना गुंगारा देणारा संशयित आरोपी अखेर सिंधुदुर्ग एलसीबीच्या जाळ्यात
