‘स्वच्छता ही सेवा’ व ‘आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता अभियान’ : मालवण नगरपरिषद व अन्य संस्था यांचा उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’, ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ तसेच ‘आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता अभियान २०२६’ अंतर्गत मालवण नगरपरिषदेच्या वतीने दांडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे स्वच्छ किनारा, सुंदर मालवण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. नगरपरिषद महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांची ही प्रमुख उपस्थिती लाभली.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या वतीने तसेच राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्था, चेन्नई आणि भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने या अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दक्षिण कोकण कांदळवन विभाग, मालवण, दिलासा फाउंडेशन, वसुंधरा जनकल्याण फाउंडेशन, वनशक्ती, यूथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थांनी देखील सहकार्य केलं. दांडी समुद्रकिनाऱ्यावर विविध प्रकारचा कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक व अन्य कचऱ्यामुळे सागरी पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता किनारे स्वच्छ ठेवणे, प्लास्टिक प्रदूषण कमी करणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.
मालवण हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून येथील समुद्रकिनारे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत. त्यामुळे समुद्रकिनारे स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी नागरिक, पर्यटक, स्थानिक संस्था आणि प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

‘स्वच्छता ही सेवा, स्वच्छता हीच जबाबदारी’ या संदेशातून स्वच्छ आणि सुंदर मालवणासाठी सामूहिक सहभागाचे आवाहन करण्यात आले.
▪️अमित खोत, मालवण

