स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात एनएसएस दिन उत्साहात ; प्रत्यक्ष निरीक्षणातून परिसरातील ५१ प्रजातींची नोंद
मालवण | प्रतिनिधी : आपल्या सभोवतालच्या निसर्गाचे आणि किनारी जैवविविधतेचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील वनस्पती, प्राणी, कीटक तसेच अन्य जैविक घटकांची माहिती संकलित करून जैवविविधतेच्या नोंदी ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध जैवविविधता तज्ज्ञ दुर्गा ठिगळे यांनी केले.
येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘जैवविविधता संवर्धन’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या कै. नरहरी प्रभुझांट्ये सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य कैलास राबते होते. व्यासपीठावर आयक्यूएसी समन्वयक प्रा. संग्रामसिंह पवार, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक आणि डॉ. संकेत बेळेकर उपस्थित होते.
दुर्गा ठिगळे यांनी देशातील विविध अभयारण्ये, त्यांचे प्रकार आणि विशेषतः मालवण सागरी अभयारण्यातील समृद्ध किनारी जैवविविधतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या ‘पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ची माहिती देताना स्थानिक जैवविविधतेची नोंद कशी करावी आणि त्यासाठी कोणती माहिती संकलित करावी, याचे प्रात्यक्षिकही त्यांनी दिले.
किल्ले निवती येथील डुंगोबाच्या देवराईतील दुर्मिळ प्रजाती, ‘सुंदरी’ ही कांदळवन प्रजाती तसेच अभिनेते सयाजी शिंदे यांनी देवराई संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.
मार्गदर्शनानंतर ठिगळे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचे पाच गट करण्यात आले. प्रत्येक गटाने महाविद्यालय परिसरात फिरून विविध वनस्पती, झुडुपे, कीटक आणि अन्य जैविक घटकांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून नोंदी घेतल्या. त्यानंतर ग्रंथालयात झालेल्या सत्रात गटप्रमुख रिद्धी काजरेकर, रिद्धी केळुस्कर, सृष्टी दिघे, सानिका भोगावकर आणि क्रांती पालव यांनी आपल्या निरीक्षणाचा अहवाल सादर केला. ठिगळे यांनी या नोंदींचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. या प्रत्यक्ष अभ्यासातून महाविद्यालय परिसरातील एकूण ५१ प्रजातींची यशस्वी नोंद करण्यात आली.
कार्यक्रमात सर्प संवर्धन आणि निसर्गशाळा उपक्रमातील उल्लेखनीय कार्याबद्दल द्वितीय वर्ष विज्ञान शाखेचा विद्यार्थी स्वप्नील गोसावी याचा दुर्गा ठिगळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. रायफल शूटिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या एनसीसी कॅडेट रूपाली करंगुटकर हिचाही गौरव करण्यात आला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एनएसएस स्वयंसेवकांसह उत्कृष्ट निरीक्षण नोंदविणाऱ्या पाचही गटप्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनघा टिकले यांनी सूत्रसंचालन करताना नष्ट होत चाललेल्या ‘दीपकाडी’ या झुडुपाची माहिती दिली. डॉ. संकेत बेळेकर यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि ६० एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.

जैवविविधता संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी ही पुढाकार घ्यावा : दुर्गा ठिगळे
