पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे बाधित शेतीच्या नुकसानीची शेतकऱ्यांकडून घेतली माहिती
प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत घेतला आढावा
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : जिल्ह्यात पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ खंडामुळे शेतीपिकांवर परिणाम होत असताना कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघातील विविध भागांत प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांची स्थिती जाणून घेत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या. पिकांची सद्यस्थिती, शेतातील पाण्याची उपलब्धता तसेच पावसाअभावी शेतीवर होत असलेल्या परिणामांची त्यांनी माहिती घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागांत भात व अन्य शेत पिकांवर परिणाम झाला.
शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केल्यामुळे स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेण्यास मदत झाली. जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या तसेच अन्य नुकसानीचा प्रशासनाकडूनही आढावा घेतला जात असून, नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्यावर भर दिला जात आहे.
या पाहणीप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, संजय पडते, काका कुडाळकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, रुपेश कानडे, विनायक राणे तसेच संबंधित अधिकारी वर्ग आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


