मालवण (प्रतिनिधी): पाण्याची टाकी साफ करत असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या मालवण तालुक्यातील कांदळगाव साळकर वाडी येथील महेश बळीराम साळकर ( 38 वर्ष ) या
युवकाचे उपचारादरम्यान गुरुवारी रात्री
उशिरा एकच्या सुमारास मालवण ग्रामीण रुग्णालय येथे निधन झाले. शुक्रवारी सकाळी कांदळगाव येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कांदळगाव साळकर वाडी येथील रहिवासी असलेला महेश बळीराम साळकर हा जयवंत साळकर, संजय साळकर, संतोष साळकर यांना घेऊन आपल्या राहत्या घराजवळ असलेली पाण्याची टाकी गुरुवारी संध्याकाळी 4:30 च्या सुमारास
साफ करत होता. अचानक जमिनीमधील माशांच्या पोळ्यामध्ये पाणी गेल्यामुळे या मधमाश्यांनी या चौघांवरती ही हल्ला केला. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे हे चौघेही गंभीर जखमी झाले होते. याबाबत आरडाओरड करताच शेजारी असलेले युवा सामाजिक कार्यकर्ते सुशांत सुर्वे यांनी त्वरित या चौघांना मालवण ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात येथील डॉक्टरांनी त्वरित या चौघांवरती यशस्वी उपचार केले. उपचारादरम्यान जयवंत साळकर, संजय साळकर, संतोष साळकर या तिघांना लगेच घरी सोडण्यात आले. महेश साळकर हा मधमाशांच्या हल्ल्यामध्ये जास्त जखमी झाला असल्यामुळे त्यावरती रात्री आठ वाजेपर्यंत उपचार करून तो पूर्णपणे बरा झाल्यामुळे त्यालाही डॉक्टरांनी घरी सोडले होते. परंतु घरी आल्या नंतर रात्री साडेबाराच्या सुमारास पुन्हा महेश याची तब्येत खालावल्यामुळे त्याला मालवण ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुशांत सुर्वे यांनी उपचारासाठी दाखल केले. परंतु रात्री एकच्या सुमारास महेशची तब्येत अचानक खालावली आणि त्याला डॉक्टरांनी मृत म्हणून घोषित केले. अचानक घडलेल्या महेशच्या मृत्यूमुळे त्याचे संपूर्ण कुटुंब हवालदिल झाले आहे. घरामध्ये वृद्ध वडील, भाऊ व विवाहित बहीण असा परिवार असून
महेश हा त्यांच्या कुटुंबात कमावणारा एकुलता एक युवक असल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
साळकर वाडी कांदळगाव येथील वाचन मंदिर येथे महेश हा कर्मचारी होता.
या कुटुंबाचे घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळे सामाजिक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील
दात्यांनी पुढे येऊन या परिवाराला सढळ हस्ते मदत करण्याची खरी गरज असल्याचे मत कांदळगाव ग्रामस्थ आणि युवा सामाजिक कार्यकर्ते सुशांत सुर्वे यांनी व्यक्त केले आहे. महेश साळकर यांच्या अचानक मृत्यूमुळे कांदळगाव मध्ये शोककळा पसरली असून येथील विजय साळकर आणि मंगल साळकर यांचा तो भाऊ होत.

कांदळगाव येथे मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेले महेश साळकर यांचा मृत्यू
