उदय बापर्डेकर | आचरा : आचरा-देऊळवाडी येथे सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या एका जाळ्यात घुबडाचे छोटं पिल्लू अडकून पडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. स्थानिक युवक दूर्वांग नलावडे यांनी पक्षीप्रेमी दशरथ घाडी यांच्याशी तात्काळ संपर्क साधला. माहिती मिळताच दशरथ घाडी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घुबडाच्या पिल्लाची जाळ्यातून अलगद व सुखरूप सुटका केली.

आचरा-देऊळवाडी येथील श्री देव गांगेश्वर मंदिराजवळ हे पिल्लू जाळ्यात अडकले होते. जाळ्यात अडकलेल्या या पिल्लाची हालचाल होत असल्याचे दूर्वांग नलावडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दशरथ घाडी यांना याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच दशरथ घाडी घटनास्थळी पोहोचले. जाळ्याच्या बारीक धाग्यांमध्ये पिल्लाचे पंख व शरीर पूर्णतः हा अडकले होते. त्यामुळे त्याला कोणतीही इजा होऊ नये याची काळजी घेत घाडी यांनी जाळे काळजीपूर्वक सोडवले आणि घुबडाच्या पिल्लाची सुखरूप सुटका केली. सुदैवाने पिल्लाला कोणतीही इजा झाली नव्हती.
सुटका केल्यानंतर घुबडाच्या पिल्लाला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. वेळीच मदत मिळाल्याने या पिल्लाचा जीव वाचला. पक्षीप्रेमी दशरथ घाडी यांनी दाखविलेल्या तत्परतेचे आचरा परिसरातून कौतुक होत आहे.

