न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर व ग्रामीण भागातील काही नागरिकांचे सोन्याचे दागिने तारण ठेवून आकर्षक परताव्याच्या जाळ्यात ओढत सुमारे ६ कोटी ९ लाख ६१ हजार ५१५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मुख्य संशयित आरोपी तथा एजंट हर्षदा आडकर (२२, रेवंडी-मालवण) हिला मालवण पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. तिला शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याकामी सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड. रुपेश देसाई यांनी बाजू मांडली व मूळ फिर्यादीतर्फे ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर, ॲड. तारिका चिंदरकर कुबल, ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर, ॲड. पलाश चव्हाण, ॲड. विवेक कुमार निषाद यांनी सरकार पक्षास सहाय्य केले.
याप्रकरणी 'मुथ्धुट फिनकॉर्प'च्या मालवण शाखेची मॅनेजर यांना यापूर्वी अटक करण्यात आली. पोलीस कोठडीनंतर त्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सोन्याचे दागिने तारण ठेवून सुमारे १२० पेक्षा अधिक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल आहे. दोघा संशयीतांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

सोने तारण फसवणूक प्रकरणीतील आणखी एका संशयित आरोपीला अटक
