सिंधुदुर्ग कॉलेज मालवण येथे सौ. मेघना जोशी यांचे मार्गदर्शन ; लायन्स क्लब ऑफ मालवणचा सामाजिक उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृतीपर सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय, मालवण येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी मनोपचार तज्ज्ञ तथा सल्लागार आणि ज्येष्ठ मार्गदर्शक सौ. मेघना जोशी यांनी उपस्थित युवा वर्गाला आत्महत्या प्रतिबंध, मानसिक आरोग्य, ताणतणाव आणि अडचणींच्या काळात योग्य मदत घेण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. मेघना जोशी यांचा लायन्स क्लब मालवणच्या वतीने अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आपल्या भावना व्यक्त करणे, अडचणींबाबत विश्वासू व्यक्तींशी संवाद साधणे आणि मानसिक तणावाच्या प्रसंगी आवश्यक ते समुपदेशन घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविद्यालयीन जीवनात अनेक विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक, कौटुंबिक व सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत सकारात्मक विचार, संवाद आणि योग्य मार्गदर्शन यांची भूमिका महत्त्वाची असते. या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला प्राचार्य के. के. राबते, लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, प्राध्यापक अन्वेषा कदम, हर्षदा धामापुरकर, स्नेहा बर्वे, प्रांजल परुळेकर, हसन खान, लायन्स क्लबच्या खजिनदार राधिका मोंडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी, गणेश प्रभुलकर, महेश अंधारी, रुजरीओ पिंटो, मुकेश बावकर, राजा शंकरदास, विश्वास गावकर, उमेश शिरोडकर, गीता आचरेकर, रूपा कांदळगावकर यांच्यासह विद्यार्थी नक्षत्रा जावकर, जतीन करंगुटकर, साहिल बागवे, माहीन शेख तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंधासारख्या संवेदनशील विषयावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ मालवणने राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
▪️अमित खोत, मालवण

