राष्ट्रीय पोषण माहनिमित्त नावीन्यपूर्ण जनजागृती उपक्रम
जंक फूडच्या ‘कुपोषण राक्षसा’वर ‘सुपोषणाच्या छत्री’चा प्रभावी संदेश
बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय मालवण आणि पंचायत समिती मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
अमित खोत | मालवण : बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (ICDS मालवण) आणि पंचायत समिती मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने 9 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर पर्यत या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय पोषण माह’ अंतर्गत पंचायत समिती परिसरात विविध नावीन्यपूर्ण जनजागृती उपक्रम, पोषण प्रतिज्ञा तसेच भव्य पोषण रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ हे मुख्य ब्रीदवाक्य समोर ठेवून तळागाळातील प्रत्येक नागरिकाचा पोषण मोहिमेत सहभाग आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमास पंचायत समिती मालवण सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी उल्का खोत-हजारे, पस सदस्य मानसी भोगावकर, योजना कांबळी, सीमा परुळेकर, माधुरी मसुरकर, रिया बावकर, दिपक चव्हाण, गणेश तोंडवळकर, दिपक सुर्वे, संजय ठाकूर, संतोष गावडे यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जंक फूडच्या ‘कुपोषण राक्षसा’वर ‘सुपोषणाची छत्री’ कार्यक्रमाचे विशेष आकर्षण
अंगणवाडी सेविकांनी सादर केलेले ‘जंक फूडच्या कुपोषण राक्षसा’वर पोषण मातेची सुपोषणाची छत्री हे अभिनव सादरीकरण. सध्याच्या काळात मुलांमध्ये वाढत असलेल्या जंक फूडच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि कुपोषणाचा धोका याचे प्रभावी चित्रण करण्यात आले. या संकल्पनेत जंक फूडमुळे निर्माण होणाऱ्या कुपोषणाच्या समस्येचे ‘राक्षसा’च्या माध्यमातून प्रतीकात्मक दर्शन घडविण्यात आले. या राक्षसापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी अंगणवाडी सेविकेने ‘पोषण माता’ची भूमिका साकारत ‘सुपोषणाची छत्री’ धरली. योग्य आणि संतुलित आहाराच्या माध्यमातून बालकांना कुपोषणापासून दूर ठेवता येते, असा प्रभावी संदेश या सादरीकरणातून देण्यात आला. या कल्पक उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
लोकसहभागातून ‘मूठभर धान्य’ आणि ‘अक्षय पात्र’ ही संकल्पना
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी उल्का खोत यांनी ९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या पोषण माहच्या विविध उपक्रमांची सविस्तर कार्यरूपरेषा मांडली. पोषणाचा संदेश केवळ अंगणवाडीपुरता मर्यादित न राहता तो प्रत्येक कुटुंबापर्यंत आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.
लोकसहभागातून ‘मूठभर धान्य’ आणि ‘अक्षय पात्र’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून, जमा झालेल्या धान्यातून ‘बालगोपाल पंगत’ आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. या उपक्रमातून समाजातील प्रत्येक घटकाला बालकांच्या पोषणाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे.
पालक, बाबा आणि आजोबांचाही सहभाग

पालक, बाबा आणि आजोबांचाही सहभाग बालकांच्या पोषणामध्ये केवळ माता किंवा अंगणवाडी सेविकांचीच नव्हे, तर बाबा, पालक आणि आजोबांचीही सक्रिय भूमिका असावी, यासाठी विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने बालकांच्या आहाराकडे आणि आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.
पोषणाचा संदेश जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न
लोककला, पाककला आणि खेळातून पोषण संदेश
पोषण विषयक जनजागृती अधिक प्रभावी करण्यासाठी पारंपरिक लोककला, खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांचा आधार घेण्यात येणार आहे. महिला व मातांसाठी पाककला स्पर्धा, पोषण फुगडी, पोषण भजन, पोषण घडा आदी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. मनोरंजनासोबतच पोषणाचा संदेश जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
पोषण प्रतिज्ञेनंतर भव्य रॅली
पोषण प्रतिज्ञेनंतर भव्य रॅली कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी सुदृढ आरोग्य आणि पोषणासाठी पोषण प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर शहरातून भव्य पोषण रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेत बालकांचे योग्य पोषण, संतुलित आहार, कुपोषण निर्मूलन आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात आली.
राष्ट्रीय पोषण माह यशस्वी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक, नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. पोषण ही केवळ शासनाची किंवा अंगणवाडी यंत्रणेची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ या ब्रीदवाक्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देत मालवण तालुक्यातील बालकांना सुदृढ, निरोगी आणि कुपोषणमुक्त भविष्य देण्यासाठी राष्ट्रीय पोषण माहच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला
▪️अमित खोत, मालवण

