ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले
मालवण | प्रतिनिधी : पोईप-खालची पालववाडी येथील मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित प्रकाश रामचंद्र पालव (वय ६४, रा. खालची पालववाडी, पोईप) यांची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली. संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी न्यायालयीन काम पाहिले.
७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याची फिर्याद पोलिसांत दाखल करण्यात आली होती. फिर्यादी आपल्या खालची पालववाडी येथील घरी असताना त्यांचा चुलतभाऊ प्रकाश रामचंद्र पालव याने घरात जबरदस्तीने प्रवेश करून फिर्यादीच्या वडिलांना ढकलून दिल्याचा आरोप आहे. यावेळी फिर्यादी मध्ये पडला असता संशयिताने लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यावर व हातावर मारहाण केल्याने हाताला फ्रॅक्चर तसेच डोक्याला दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मालवण पोलिसांनी तक्रार दाखल करून भारतीय न्याय संहिता कलम 115(1), 118(1), 118(2), 333 व 352 अन्वये गुन्हा नोंदविला. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले होते. अधिक तपासासाठी न्यायालयाने संशयिताला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयिताला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर संशयितातर्फे जामीन अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर संशयिताची मुक्तता करण्याचे आदेश दिले.

पोईप-पालववाडी मारहाण प्रकरणातील संशयिताची सशर्त जामिनावर मुक्तता
