वीज वितरण ने तात्काळ कार्यवाही करावी
नगरसेविका दर्शना कासवकर यांनी वेधले लक्ष
मालवण | प्रतिनिधी : धुरीवाडा कासवकर बालोद्यान परिसराच्या बाजूला वीज खांब धोकादायक स्थितीत कलंडला आहे. एका माडाच्या झाडाच्या आधाराला हा खांब असून वीज वाहिन्या माडाला टेकल्यामुळे वीज प्रवाहित होत असल्याने अपघातीची भीती व्यक्त केली जात आहे. तरी वीज वितरणने तात्काळ धोकादायक वीज खांब योग्य स्थितीत करावा अथवा नव्याने उभारणी करावी. तसेच परिसरातील वीज समस्या ही तात्काळ सोडवाव्यात. असे सांगत नगरसेविका दर्शना कासवकर यांनी वीज वितरणचे लक्ष वेधले.
तसेच येथील कासवकर बालोद्यान मधील ट्रान्सफॉर्मर मधून तीन फेज मधील एका फेज वर लाईन चालू आहे. त्यामुळे गणपती सण काळात वीज पुरवठा खंडित होण्याची अथवा कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची शक्यता आहे. तरी याबाबत तातडीने लक्ष देऊन कार्यवाही व्हावी.
जनतेला तत्पर आणि अधिकाधिक सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. असे असताना प्रशासन स्तरावरूनही गतिमान कार्यभार अपेक्षित आहे. वीज वितरण नेही आपला कारभार गतिमान करून जलद गतीने सेवा द्यावी असेही दर्शना कासवकर यांनी सांगितले.

धोकादायक स्थितीत कलंडलेल्या वीज खांबामुळे अपघाताची भीती
