१९ वर्षांखालील मुलींच्या टेबल टेनिस स्पर्धा
मालवण | प्रतिनिधी : क्रीडा व युवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षांखालील मुलींच्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. नक्षत्रा परेश जावकर हिने प्रभावी खेळी करत उल्लेखनीय कामगिरी बजावली. या दमदार कामगिरीच्या जोरावर तिची विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
ही जिल्हास्तरीय स्पर्धा जय गणेश स्कूल, मालवण येथे पार पडली. स्पर्धेत नक्षत्राने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना चांगली लढत दिली. तिच्या या कामगिरीमुळे विभाग स्तरावर खेळण्याची संधी तिला मिळाली आहे.
नक्षत्राच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किरण जी. ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी तिचे अभिनंदन केले असून, विभाग स्तरावरील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेसाठी सौ. स्नेहा चंद्रशेखर बर्वे यांचे सहकार्य लाभले. नक्षत्राच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
▪️अमित खोत | मालवण

नक्षत्रा जावकरची विभाग स्तरावर निवड
