मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण भरारी
कुडाळ | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‘वादविवाद इंग्रजी’ (इंग्लिश डिबेट) या प्रकारात कॉलेजचे विद्यार्थी सहिष्णू सुयोग पंडित आणि लिऑन पिंटो यांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

या स्पर्धेची अंतिम फेरी ८ सप्टेंबर २०२६ रोजी चर्चगेट येथील विद्यार्थी विद्यापीठ भवनात उत्साहात संपन्न झाली. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक मिळवत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांनी व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
इंग्रजी वादविवादासारख्या बौद्धिक आणि कौशल्याधारित स्पर्धेत दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रभावी मांडणी करत आपले वक्तृत्व व वैचारिक क्षमता सिद्ध केली. त्यांच्या या यशामुळे कॉलेजमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचे चेअरमन व्हिक्टर डांटस, प्राचार्य डॉ. शिल्पा मर्गज, प्राध्यापक संग्राम गावडे तसेच प्राध्यापक वर्ग आणि व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज, कुडाळच्या वतीने सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
▪️अमित खोत | मालवण

