शहर परिसरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन : प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
मालवण | प्रतिनिधी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहर व तालुक्यातील वाहतूक व्यवस्था, कायदा-सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि गणेशमूर्ती आगमन मार्ग व विसर्जन व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा. गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये तसेच गणेशभक्तांना सुरक्षित आणि सुरळीत वातावरण मिळावे, यासाठी विविध विभागांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, नगरपरिषद, महावितरण, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, रिक्षा संघटना तसेच खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
शहरातील वाहतुकीसाठी विशेष नियोजन
गणेशोत्सव काळात मालवण शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. नाट्यगृह आवार व बांगीवाडा येथे सहा सीटर वाहनांसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. सारस्वत बँक परिसरात मोटारसायकली एका बाजूने शिस्तबद्ध पद्धतीने लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बाजारपेठेतील राणे मेडिकल येथून सर्व वाहनांच्या वाहतुकीवर बंदी राहणार आहे. तसेच बॉम्बे टेक्सटाईल परिसरातून सायकलींसाठी प्रवेश ठेवण्यात येणार असून, नेरुरकर गल्ली सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. नो-पार्किंगमध्ये वाहने लावल्यास दंडात्मक कारवाई गणेशोत्सव काळात बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता बाजारपेठ रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पार्किंग बंद करण्यात आले आहे. नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करून गेल्यास संबंधित वाहनधारकांवर पोलिस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच देऊळवाडा नाका येथून अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. शहरातील प्रमुख नाक्यांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करून वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
फळ विक्रेत्यांसाठी जागा निश्चित
भंडारी हायस्कूल ते भाजी मार्केट या मार्गावर बाजारपेठेतील फळ विक्रेत्यांनी नगरपरिषदेने निश्चित केलेल्या जागेत वाहतूकिस अडथळा होणार नाही अश्या एका रांगेत व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे व्यवसाय केल्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात येणार आहे.
ध्वनिक्षेपकासाठी ऑनलाइन परवाना आवश्यक
गणेशोत्सव मंडळांकडून ध्वनिक्षेपक, बॅन्जो व स्पीकरचा वापर करताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी ऑनलाइन परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
विसर्जनस्थळी जीवरक्षकांची नियुक्तीच्या सूचना
गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरासह ग्रामपंचायत हद्दीतील विसर्जनस्थळी जीवरक्षक नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विसर्जनस्थळी आवश्यक सुरक्षितता उपाययोजना, आरोग्य सुविधा आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यावरही भर देण्यात आला. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, तसेच नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

गणेशोत्सवासाठी मालवण पोलिस प्रशासन सज्ज
