कुडाळच्या श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक
भजनप्रेमींनी अनुभवला भक्तिरसाचा अविष्कार
मंगेश नलावडे | मालवण : श्री देव भूतनाथ मंदिर, वायरी भूतनाथ येथे दर श्रावण सोमवारी आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्रातील पहिली भारुडासहित जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा २०२५-२६ भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संगीत भजनासोबत भारुडाची अनोखी सांगड घालत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला भजनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ (बुवा हर्षद ढवळ) यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी (बुवा प्रसाद आमडोसकर) यांनी द्वितीय, तर समाधीपुरुष प्रासादिक भजन मंडळ, मळगाव (बुवा गौरांग राऊळ) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तसेच ब्रह्मणदेव महिला मंडळ, पावशी (बुवा प्रियांका तवटे), दत्तकृपा भजन मंडळ, कुडाळ (बुवा नरेंद्र मेस्त्री), सिद्धीविनायक मंडळ, कणकवली (बुवा दुर्गेश मिठबावकर) आणि सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ (बुवा वैभव सावंत) यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत पारितोषिके पटकावली.
वैयक्तिक पारितोषिकांतही 
कलाकारांची चमक
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना विविध वैयक्तिक पारितोषिकांनी गौरविण्यात आले. उत्कृष्ट गायक म्हणून दुर्गेश मिठबावकर, उत्कृष्ट हार्मोनियम म्हणून वैभव सावंत, उत्कृष्ट पखवाज प्रथमेश राणे, उत्कृष्ट तबला संदीप केरवडेकर आणि उत्कृष्ट झांज म्हणून काव्या पवार यांची निवड करण्यात आली. उत्कृष्ट कोरसचा पुरस्कार श्री भवानी प्रासादिक भजन मंडळ, आंबेरी यांना देण्यात आला.

मान्यवरांचे मार्गदर्शन
स्पर्धेचे परीक्षक म्हणून आत्माराम उर्फ दाजी गोसावी आणि राजेश गुरव सर यांनी काम पाहिले. संपूर्ण स्पर्धेचे निवेदन विनोद सातार्डेकर यांनी केले. तसेच भजन सम्राट भालचंद्र केळुसकर बुवा यांचे स्पर्धेला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण
बक्षीस वितरण सोहळ्यास वायरी भूतनाथचे सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच प्राची माणगावकर, भालचंद्र केळुसकर, माजी सरपंच महेश लोकेगावकर, आनंद हडकर, बाळकृष्ण करलकर, कृष्णा गोसावी, देवानंद लोकेगावकर, कुणाल नाईक, अजय जोशी यांच्यासह श्री भूतनाथ देवस्थानचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारुड आणि संगीत भजनाच्या माध्यमातून भक्ती, लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडविणाऱ्या या स्पर्धेने वायरी भूतनाथच्या धार्मिक-सांस्कृतिक वातावरणात विशेष रंग भरला.
▪️अमित खोत | मालवण

वायरी भूतनाथ येथे भारुडासहित संगीत भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
