मालवण खरेदी-विक्री संघात शेतकरी व विक्रेत्यांच्या अडचणी घेतल्या जाणून
मालवण | प्रतिनिधी : FFS प्रणालीअंतर्गत खत बुकिंग व वितरण प्रक्रियेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग भाग्यश्री नाईकनवरे यांनी मालवण येथील शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाला प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी तसेच खत विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी मोहिम अधिकारी राहुल माने, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले, कृषी अधिकारी गुणनियंत्रण, मालवण जयश्री दूधभाते, विस्तार अधिकारी कृषी, पंचायत समिती मालवण विनायक जाधव व सुधीर गायकवाड उपस्थित होते. पाहणीदरम्यान भाग्यश्री नाईकनवरे यांनी FFS प्रणालीद्वारे शेतकऱ्यांकडून खताचे बुकिंग करण्याची प्रक्रिया, त्यानंतर QR कोड जनरेट करणे तसेच QR कोडच्या आधारे खताची विक्री व वितरण कशा पद्धतीने केले जाते, याची प्रत्यक्ष माहिती घेतली.
तसेच खत बुकिंग व वितरणाच्या वेळी शेतकरी आणि विक्रेत्यांना येणाऱ्या विविध अडचणींबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. संबंधित अडचणींचे निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना व खत विक्रेत्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. FFS प्रणालीअंतर्गत खत बुकिंग व वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि सुरळीत व्हावी, तसेच शेतकऱ्यांना खत मिळविताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित अधिकारी व खत विक्रेत्यांना आवश्यक सूचना यावेळी देण्यात आल्या.

FFS प्रणालीतील खत बुकिंग, वितरण प्रक्रियेची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी
