इंगळे न्हाणे ठरले जत्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण ; भाविकांची अलोट गर्दी
मंगेश नलावडे | मालवण प्रतिनिधी : मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा वार्षिक श्रावण जत्रोत्सव सोमवारी (३१ ऑगस्ट) भाविकांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. ग्रामदैवत सातेरी देवीच्या श्रावण जत्रोत्सवातील पारंपरिक ‘इंगळे न्हाणे’ अर्थात पेटत्या निखाऱ्यांनी दृष्ट काढण्याचा धार्मिक सोहळा यंदाही भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला.
मालवणच्या श्री देव रामेश्वर, नारायण व सातेरी देवस्थानच्या वतीने दरवर्षी श्रावण उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक रूढी-परंपरा जपत हा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यावर्षी सोमवारी सकाळी देवीची विधिवत पूजा-अर्चा करून श्रावण जत्रोत्सवाला सुरुवात झाली. सकाळी १० वाजता देवस्थानच्या मानकऱ्यांच्या हस्ते देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर उपस्थित भाविक महिला व भक्तांनी देवीचे दर्शन घेत ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी केली.

जत्रोत्सवानिमित्त मालवणच्या देऊळवाडा परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सातेरी देवी मंदिर परिसरात विविध धार्मिक साहित्यांची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच लहान मुलांसाठी खेळणी व मनोरंजनाची विविध दुकानेही उभारण्यात आली होती.
दुपारी १२ वाजता झालेला ‘इंगळे न्हाणे’ हा पारंपरिक धार्मिक सोहळा जत्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरला. सुरुवातीला ग्रामदेवता श्री देवी सातेरीची दृष्ट काढण्यात आली. त्यानंतर देवस्थानचे बारापाच व आठ मानकरी गांवकर, बांदेकर, लुडबे, कीर, रंगावडे, कुलकर्णी, धुरी, घाडी व बोडवे या मानकरी कुटुंबीयांची दृष्ट काढण्यात आली. यानंतर उपस्थित भाविक भक्तांनीही या पारंपरिक सोहळ्यात सहभाग घेतला.
‘इंगळे न्हाणे’ ही मालवणमध्ये पूर्वापार चालत आलेली आगळीवेगळी धार्मिक परंपरा आहे. या विधीत पेटत्या आगीतील निखारे घेऊन ओवाळणी केली जाते. श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेल्या या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी मालवण तालुक्यासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

सायंकाळी पर्यंत देवीची ओटी भरण्याचा सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू होता. रात्री मंदिरात सुस्वर संगीत भजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी ग्रामदैवत श्री देवी सातेरी आईचा वार्षिक श्रावण जत्रोत्सव आनंदोत्सवात संपन्न झाला.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष हरिष वसंत गांवकर, बाबाजी गांवकर अक्षय गांवकर, रमेश गांवकर, यशंवत रंगावडे, भिमसेन गांवकर, आनंद गांवकर, महेश गांवकर, दिनेश गांवकर, अमेय बादेकर, अरविंद गांवकर, जगदीश किर, आप्पा गांवकर, राजन बादेकर, संजय लुडबे, उदय गांवकर श्रीदेव रामेश्वर, नारायण, सातेरी देवस्थान चे मानकरी व देऊळवाडा येथील ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▪️ छाया : राहुल जाधव ,मालवण

