सिंधुदुर्ग जिल्हापरिषद माजी अध्यक्षा सरोज परब यांचे निधन
शिक्षण, समाजसेवा आणि राजकारणात कर्तृत्वाचा उमटवला ठसा
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा मसुरे गावच्या सुकन्या सौ. सरोज शिवाजी परब (वय ६६) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मसुरेसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. स्नेहशील स्वभाव, माणुसकीची जपणूक, सामाजिक बांधिलकी आणि कर्तृत्वाची जाण असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्गच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या सरोज परब यांनी आपल्या प्रदीर्घ प्रवासात केवळ पदे भूषविली नाहीत, तर माणसे जोडली, नाती जपली आणि समाजाशी असलेले आपले नाते कायम जिव्हाळ्याने टिकवून ठेवले. शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना त्यांनी समाजाशी असलेली बांधिलकी जपली आणि पुढे राजकीय व सामाजिक क्षेत्रातही सक्रिय योगदान दिले.
राणे कुटुंबाच्या कट्टर समर्थक आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. राणे परिवाराशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकीय परिस्थिती बदलली, भूमिका बदलल्या, तरी त्यांनी आपल्या निष्ठेत आणि प्रामाणिकपणात बदल होऊ दिला नाही. त्यांच्या या स्वभावामुळे राजकीय क्षेत्रातही त्यांच्याबद्दल आदराची भावना होती.
टोपीवाला हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून त्यांनी अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्याचे समाधान मिळवत त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. मात्र, सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा समाजाशी असलेला संबंध तुटला नाही. शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि समाजातील विविध घटकांशी असलेला जिव्हाळा यामुळे सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी नेहमीच संवेदनशील राहिली.
मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले. या प्रवासात त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. सामान्य कार्यकर्त्यापासून जिल्ह्याच्या सर्वोच्च स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंतची त्यांची वाटचाल ही संघर्ष, कर्तृत्व आणि जनसंपर्काच्या बळावर उभी राहिलेली प्रेरणादायी कहाणी होती. पदापेक्षा माणसांना महत्त्व देणारे व्यक्तिमत्त्व सरोज परब यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख त्यांच्या पदांपेक्षा त्यांच्या माणुसकीत आणि माणसे जोडण्याच्या स्वभावात होती.
राजकारणात स्पष्टवक्तेपणा आवश्यक असला तरी त्यासोबत नात्यांमध्ये आपुलकी, सहकाऱ्यांप्रती जिव्हाळा आणि सामान्य माणसाच्या भावनांची जाण त्यांनी कायम जपली. त्यामुळेच विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांतील व्यक्तींशी त्यांचे आत्मीय संबंध होते. राजकारणातील बदलत्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या विचारांशी आणि नात्यांशी प्रामाणिक राहण्याला महत्त्व दिले.
शिक्षणातून समाजसेवे पर्यंतचा प्रवास
सरोज परब यांचे सामाजिक कार्य हे एखाद्या एका उपक्रमापुरते मर्यादित नव्हते. शिक्षण क्षेत्रात काम करताना विद्यार्थ्यांशी जोडलेले नाते, जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष म्हणून ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण आणि सेवानिवृत्तीनंतरही विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी जोडलेले राहण्याची त्यांची वृत्ती, यातून त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते. मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी त्या कार्यरत होत्या. शिक्षणसंस्थांशी असलेला त्यांचा हा संबंध त्यांच्या आयुष्यभराच्या शैक्षणिक बांधिलकीचेच प्रतीक होता. विद्यार्थ्यांचे शिक्षण, संस्थांचा विकास आणि समाजातील सकारात्मक बदल याबाबत त्यांना विशेष आस्था होती. त्यांच्या कार्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सामान्य माणसाशी असलेला थेट संवाद. मोठ्या पदावर असतानाही त्या सर्वसामान्यांपासून दूर गेल्या नाहीत. आपल्या भेटीला येणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, आपुलकीने संवाद साधणे आणि शक्य त्या पातळीवर मदतीचा प्रयत्न करणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता. त्यामुळे त्यांच्याशी राजकीय संबंध नसलेल्या व्यक्तींनाही त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटत असे.सिंधुदुर्गच्या सार्वजनिक जीवनात अनेक व्यक्ती पदांमुळे मोठ्या होतात; मात्र पद संपल्यानंतरही ज्यांच्या नात्यांची आणि माणुसकीची उब कायम राहते, अशा व्यक्तींची उणीव समाजाला प्रकर्षाने जाणवते. सरोज परब यांचे व्यक्तिमत्त्व याच अर्थाने वेगळे होते. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गने एक अनुभवी लोकप्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ती, सामाजिक बांधिलकी जपणारी व्यक्ती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणुसकीचा आणि आपुलकीचा चेहरा गमावला आहे. त्यांच्या कार्याच्या आठवणी, त्यांनी जोडलेली माणसे आणि समाजासाठी केलेले योगदान यामुळे त्यांची स्मृती कायम जिवंत राहील.
आज रविवारी (३० ऑगस्ट) दुपारी १ वाजता मसुरे मर्डेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, भाऊ, बहिणी, दीर, भावजयी, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. मालवण नगरपालिकेच्या शिवसेना नगरसेविका तथा आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण आणि मसुरेचे माजी उपसरपंच राहुल परब यांच्या त्या मातोश्री, तर सेवानिवृत्त एस.टी. वाहतूक नियंत्रक व समाजसेवक शिवाजी परब यांच्या पत्नी होत.

माणुसकी जपणारा आपुलकीचा चेहरा हरपला!
