नारळ लढवणे स्पर्धेत स्वप्ना मणचेकर प्रथम; फ्रिज, पैठणी, सोन्याची नथ व १० लाखांचा विमा
स्पर्धेला शेकडो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मंगेश नलावडे : मालवण | प्रतिनिधी : मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला नारळी पौर्णिमा उत्सव गुरुवारी मालवण बंदर जेटी येथे शेकडो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नारळ लढवणे स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक मालवणी संस्कृतीचा जागर करत आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यामुळे बंदर जेटी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
व्यापारी संघाच्या वतीने समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर सायंकाळी ४ वाजता नारळ लढवणे स्पर्धेला सुरुवात झाली. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या पुढाकारातून २०१६ पासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, यंदा स्पर्धेचे अकरावे वर्ष होते.
स्पर्धेतील विजेत्या महिलांना मंडळाच्या सल्लागार अॅड. अमृता अरविंद मोंडकर, साक्षी वंजारी, आर्या मुणगेकर, रेश्मा नागवेकर, विद्या फर्नांडिस आणि रुपाली फर्नांडिस यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्वप्ना वासुदेव मणचेकर यांना फ्रिज, पैठणी, सोन्याची नथ, १० लाख रुपयांचा विमा तसेच आर्या हेल्थ केअरच्या वतीने आयुर्वेदिक स्किन केअर किट देण्यात आले.
द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या शर्वरी शिवराज सावंत यांना मिक्सर, पैठणी, सोन्याची नथ, १० लाख रुपयांचा विमा आणि आर्या हेल्थ केअरच्या वतीने आयुर्वेदिक स्किन केअर किट देण्यात आले.
तृतीय क्रमांकाच्या विजेत्या रिया राजेंद्र वाघ यांना कुकर, पैठणी, चांदीची पैंजण तसेच आयुर्वेदिक स्किन केअर किट देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्या अंजली चंद्रशेखर आंबेरकर यांना गॅस शेगडी, पैठणी आणि चांदीची पैंजण देण्यात आली.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना मंडळाच्या वतीने नारळ मोफत देण्यात आले. तसेच स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या महिला-भगिनींना सामाजिक संदेश असलेली कुपने देण्यात आली होती. या कुपनमधून घेण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये समीक्षा आळवे आणि योगिता गणेश कुबल या विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
या सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्ह्यातील नामवंत बाल नृत्य कलाकारांनी कोळी नृत्य व लावणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. बाल जादूगार निखिल ओटवणेकर याच्या जादूच्या शोनेही उपस्थितांचे मनोरंजन केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे बंदर जेटीवरील वातावरण आनंदमय झाले होते.
शेकडो महिलांच्या उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्या तसेच सहभागी सर्व महिलांना आर्या हेल्थ क्लबच्या माध्यमातून तीन दिवसीय ऑनलाइन मोफत ट्रायल तसेच आरोग्यविषयक मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत तीन वेळा प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महिलेस विशेष प्रावीण्य म्हणून ९ ग्रॅम सोन्याचा हार बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर, सदस्य देवानंद लुडबे, गणेश पाडगावकर, शुभदा पाडगावकर, रेश्मा खंदारे-नागवेकर, विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, आर्या मुणगेकर, निशा संदीप लाड, कोळंब सरपंच सिया चेतन धुरी, रुपाली फर्नांडिस, वायरी उपसरपंच प्राची पराग माणगावकर, स्नेहल मेथर, मंडळाच्या सल्लागार नोटरी वकील अमृता मोंडकर, अवनीश मेथर आदी उपस्थित होते.
आमदार निलेश राणे, माजी आमदार वैभव नाईक, दत्ता सामंत, ममता वराडकर, अशोक सावंत, सुदेश आचरेकर, दीपलक्ष्मी पडते, साक्षी वंजारी, मेघनाद धुरी, दीपक पाटकर, राजन वराडकर, बाळू अंधारी, बाबी जोगी, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, संदेश कोयंडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यांनी उपस्थित राहून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली.

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचा नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात
