स्थानिक नागरिक, प्राणीमित्र व वनविभागाच्या तत्परतेमुळे वाचले प्राण
मंगेश नलावडे | मालवण : मालवण शहरातील भरड नाका येथील दत्त मंदिराजवळ सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून माकडाचे एक पिल्लू खाली पडल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत पडलेल्या या पिल्लाला स्थानिक नागरिक, प्राणीमित्र आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचवण्यात यश आले.
ही घटना स्थानिक व्यावसायिक राजन बादेकर यांच्या दुकानासमोर घडली. माकडाचे पिल्लू विजेचा धक्का लागून खाली पडल्याचे लक्षात येताच राजन बादेकर यांनी तातडीने श्रीराज बादेकर यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच श्रीराज बादेकर यांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
दरम्यान, प्राणीमित्र तेजस नार्वेकर तसेच डॉ. रमाकांत गावकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेतील माकडाच्या पिल्लावर तातडीने प्राथमिक उपचार सुरू केले. वनविभागाचे आरआरटी अधिकारी केदार हडकर हेही घटनास्थळी दाखल झाले.
पिल्लाची प्रकृती लक्षात घेऊन पुढील उपचारांसाठी त्याला कट्टा येथे नेण्यात आले. स्थानिक नागरिकांनी दाखवलेली तत्परता तसेच प्राणीमित्र, डॉक्टर आणि वनविभागाच्या समन्वयामुळे जखमी पिल्लाला वेळेत उपचार मिळाले आणि त्याचे प्राण वाचवण्यात यश आले.
यावेळी श्रीराज बादेकर, राजन बादेकर, प्रसाद हळदणकर, अदिती आचरेकर यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व प्राणीमित्र उपस्थित होते. या घटनेमुळे जखमी वन्यप्राणी आढळल्यास वेळ न दवडता वनविभागाला माहिती देऊन त्यांना तातडीने उपचार मिळवून देण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

विजेचा धक्का लागून पडलेल्या माकडाच्या पिल्लाला जीवदान..
