विज्ञान-तंत्रज्ञानासह कोडिंग, रोबोटिक्स, AI, AR आणि IoT चे विद्यार्थ्यांना मिळणार प्रात्यक्षिक शिक्षण
मालवण | प्रतिनिधी : माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, कोडिंग, रोबोटिक्स तसेच नवोन्मेषी विचारांची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने ई-टिंकर लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बाबाराव राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

या ई-टिंकर लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता प्रयोग व कृतीच्या माध्यमातून तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव घनश्याम राणे, ई-टिंकर लॅबचे संचालक अभिजीत सहस्रबुद्धे, कृष्णमूर्ती सर, प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश तावडे, माजी मुख्याध्यापक सुरेश परब, कुणकवळे केंद्राचे केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी श्रीकृष्ण सावंत, कट्टा केंद्राचे केंद्रप्रमुख गौरव नाईक, संस्थेचे पदाधिकारी अतीक शेख, सुभाष सावंत, प्रदीप सावंत, ग्रामपंचायत खरारे-पेंडूरच्या प्रभारी सरपंच सौ. नेहा परब, ग्रामसेविका सौ. सापळे, पालक संघाचे उपाध्यक्ष संजय वारिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ई-टिंकर लॅबची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधांची माहिती घेतली. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ही लॅब महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगत शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
“प्रयोगातून शिक्षण, तंत्रज्ञानातून नवसर्जन आणि नवसर्जनातून उज्ज्वल भविष्य” या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ई-टिंकर लॅब विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्यासोबतच त्यांच्या सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि तांत्रिक कौशल्यांच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
▪️अमित खोत, मालवण

