मुख्य संशयित आरोपीच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ
मालवण | प्रतिनिधी : कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून मालवण येथील भारती धारकर यांच्यासह अन्य गुंतवणूकदारांची ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित शुभम कृष्णात देशमुख (२७, रा. एकोंडी, कागल, जि. कोल्हापूर) याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी तीन दिवसांची वाढ केली.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मुदत संपल्यानंतर १७ ऑगस्ट रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. तपासादरम्यान आरोपीकडून तांत्रिक पुरावे तसेच फसवणुकीच्या रकमेबाबत अधिक माहिती मिळवणे आवश्यक असल्याने न्यायालयाने आणखी तीन दिवसांची कोठडी दिली आहे.
सरकार पक्षातर्फे ॲड. उज्ज्वला जाधव यांनी बाजू मांडली. तसेच फिर्यादीतर्फे ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर, ॲड. तारिका चिंदरकर-कुळकर्णी, ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर, ॲड. प्राजक्ता शिंदे व ॲड. प्रसाद सावंत यांनी सहाय्य केले. प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे करीत आहेत.

लाखोंच्या कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक..
