मच्छीमारांना विविध शासकीय योजनांची माहिती
TED उपकरणांचे वाटप, मार्गदर्शक पुस्तकाचे अनावरण
वेंगुर्ला | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत मच्छीमार बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी वेंगुर्ला येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी नगर वाचनालय सभागृह, वेंगुर्ला येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सद्यस्थितीत विभागामार्फत मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्याचे प्रस्तावित असून, या योजनेची मच्छीमारांमध्ये व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच योजनेच्या मार्गदर्शक पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

नौका मालकांसाठी TED (Turtle Excluder Device) उपकरणाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच उपस्थित पात्र नौका मालकांना TED उपकरणांचे वाटप करण्यात आले. याशिवाय GAIS, NFDP नोंदणी आणि KCC योजना यांसह मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित मच्छीमारांना देण्यात आली.

यावेळी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी भक्ती पेजे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी उत्कर्षा कीर, तसेच सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी गणेश टेमकर यांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील विविध योजनांचा मच्छीमार बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच योजनांची माहिती इतर मच्छीमारांपर्यंत पोहोचवून व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला वेंगुर्ला तालुक्यातील मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे ६० ते ७० मच्छीमारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विविध योजनांची माहिती घेतली.
▪️अमित खोत

