भाऊ भोगले | बागायत:
"उद्योजक होण्यासाठी स्वतःमधील कौशल्याचा योग्य वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कौशल्याशिवाय उद्योजक घडत नाही.आजच्या काळात केवळ नोकरीपेक्षा उद्योजकतेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.वडाचापाट हायस्कूलसारख्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यवसाय शिक्षण दिले जाते, ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे," असे प्रतिपादन रामेश्वर प्रिंटिंग प्रेस, मालवणचे मालक तसेच मालवण तालुका गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योजक समीर वर्दम यांनी केले.
श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. एच. कुबल होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योजक समीर वर्दम उपस्थित होते. यावेळी मल्टी स्किल फाउंडेशन कोर्सचे निदेशक केशव भोगले, जगन्नाथ आंगणे,भक्ती पालव,नेहा गवंडे, सहाय्यक शिक्षिका वेदिका दळवी, प्रतिभा केळुसकर,पाटकर, लिपिक महेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समीर वर्दम म्हणाले, "माझे औपचारिक शिक्षण कमी असले तरी कौशल्याच्या बळावर आज मी मालवण तालुक्यातील मोठ्या प्रिंटिंग प्रेसचा मालक आहे. माझ्यासोबत अनेकांना विविध व्यवसाय सुरू करून देत त्यांनाही उद्योजक बनविण्याचे काम केले आहे.अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीही सातत्याने प्रयत्न सुरू आहेत."
ते पुढे म्हणाले, "शालेय जीवनातच व्यवसाय शिक्षण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्याला योग्य दिशा मिळेल आणि भविष्यात ते यशस्वी उद्योजक बनू शकतील. केवळ नोकरी करणारे न बनता रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक व्हा. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे कौशल्यपूर्ण कारागिरांची मोठी गरज आहे. शहरांच्या मोहात न पडता स्वतःच्या कौशल्याच्या आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवा. भंडारी एज्युकेशन सोसायटीने हा अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना बालवयातच व्यावसायिक दृष्टिकोन दिला आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे."
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापकांनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन जगन्नाथ आंगणे यांनी, तर प्रास्ताविक केशव भोगले यांनी केले.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या विविध वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि सर्जनशीलतेचे भरभरून कौतुक केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नेहा गवंडे यांनी केले.

वडाचापाट हायस्कूलमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा
