ग्रामीण कृषी कार्य अनुभव (रावे) कार्यक्रम शुभारंभ
मालवण | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषी कन्या ग्रामीण कृषी कार्य अनुभव (Rural Agricultural Work Experience – RAWE) रावे कार्यक्रमांतर्गत किर्लोस गावामध्ये दाखल झाल्या आहेत.
यावेळी कृषी कन्या प्रिया अमर पाटील, स्नेहल बाळकृष्ण जगताप, पार्णिका प्रसाद जाधव, शिवानी के. एस. व अमृतांजली पी. आर. यांनी ग्रामपंचायत कार्यालय किर्लोस येथे भेट देऊन ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. रावे कार्यक्रमाची उद्दिष्टे, कार्यपद्धती तसेच गावामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी व विस्तार उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी सरपंच सौ. साक्षी संदीप चव्हाण यांच्याशी रावे कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. ग्रामविकास, कृषी क्षेत्रातील संधी तसेच शेतकरी आणि कृषी विद्यार्थ्यांमधील ज्ञानविनिमय याबाबत सकारात्मक विचारांची देवाणघेवाण यावेळी झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर, रामेश्वर सोसायटी किर्लोस चे चेअरमन स्वानंद भावे, ग्रामपंचायत कर्मचारी किशोर किर्लोस्कर आणि केतन किर्लोस्कर उपस्थित होते.
रावे कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, कृषी व्यवस्थापन, ग्रामपंचायत प्रशासन तसेच कृषी विस्तार कार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून गावातील शेतकरी व ग्रामस्थांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती पोहोचविण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत आगामी कालावधीत गावामध्ये विविध कृषी, सामाजिक व विस्तारविषयक उपक्रम राबविण्यात येणार असून त्यातून गावाच्या कृषी विकासास चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
▪️ अमित खोत, मालवण

