निष्क्रिय आमदार दीपक केसरकरांनी तत्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा : काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर
सावंतवाडी, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई, बेरोजगारी, स्थानिक प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि विविध वादग्रस्त प्रकरणांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता.
सावंतवाडी शहरातून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "निष्क्रिय आमदार हद्दपार करा", "जनतेची फसवणूक करणाऱ्यांनी राजीनामा द्यावा" यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या.

मोर्चादरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. मतदारसंघातील विकासकामांबाबत मोठमोठी आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात जनतेच्या पदरी निराशाच पडल्याचा आरोप त्यांनी केला. वाढती महागाई, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील वाद, स्थानिक युवकांवर होत असलेला अन्याय आणि रखडलेली विकासकामे याबाबत आमदार केसरकर अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
याशिवाय, अशोक खरात प्रकरणात आमदार केसरकर यांचेही नाव जोडले गेले असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. जनतेचा विश्वास गमावलेल्या आमदारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मोंडकर यांनी केली.
मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले. या आंदोलनामुळे सावंतवाडीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले.काँग्रेसनेही आमदार केसरकरांविरोधात थेट रस्त्यावर उतरून राजीनाम्याची मागणी केली आहे.

