यंदा भारतात सरासरी पेक्षा कमी पाऊस..
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी दिली माहिती ..
मालवण | प्रतिनिधी : 'एल निनो' चा मोठा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे देशभरात काही ठिकाणी कमी पावसामुळे दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. व त्याच बरोबर उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. पॅसिफिक महासागरात वेगाने निर्माण होत असलेल्या एल निनोमुळे २०२६ चा मान्सून गेल्या ११ वर्षांतील सर्वात कमकुवत मान्सून राहण्याची शक्यता आहे. असे मत भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केले आहे.
एल निनो ही एक नैसर्गिक हवामान घटना आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान असामान्यपणे वाढते.पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे (MoES) सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी सांगितले की, "जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत नैऋत्य मान्सून हंगामात सरासरी मान्सून पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या ९०% असण्याची शक्यता आहे." त्यांनी नमूद केले की, हे प्रमाण एप्रिलमधील ९२% च्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा कमी आहे.
२०२६ च्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ९०% पाऊस पडण्याची शक्यता आहे, जो 'सरासरीपेक्षा कमी' (Below Normal) मानला जातो. जागतिक हवामान संस्थांच्या मते, २०२६ चा एल निनो हा अतिशय तीव्र म्हणजेच 'सुपर एल निनो' (Super El Niño) असू शकतो, ज्याचा जोर जुलै-ऑगस्टमध्ये वाढेल आणि सप्टेंबरमध्ये तो पूर्णपणे तीव्र होईल. मध्य भारत, दक्षिण द्विकल्प आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल.
महाराष्ट्रातील काही भाग, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांचा (Heatwaves) प्रभाव जास्त काळ राहील असा अंदाज हवामान विभागाकडून केला गेला आहे.

'एल निनो' चा मोठा प्रभाव असण्याची शक्यता
