- बचतगटांचे सक्षम नेतृत्व
💐 नवदुर्गा : पुष्प पहिले 💐
देवीचे रूप आईत आहे, देवीचे रूप बहिणीत आहे, देवीचे रूप पत्नीत आहे, देवीचे रूप मुलीत आहे. प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना आजच्या युगातील प्रत्येक स्त्री शक्तीलाही आदरयुक्त प्रणाम.
देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने 'स्काय न्यूज टुडे’ वेब टीमच्या माध्यमातून नवदुर्गा या सदरातून स्त्री शक्तीच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….
नवदुर्गा : सौ. साधना सतीश माडये

काही व्यक्तिमत्व अशी असतात कि त्यांच्याकडे उपजतच नेतृत्व गुण असतात. चार चौघात अशी माणसं ठळकपणे दिसून येतात. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावच्या सौ. साधना सतीश माडये. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीतच त्यांनी बचतगटांच्या महिलांचे संघटन उभे केले. सुमारे अडीज ते ३ हजार महिलांचे त्या नेतृत्व करत आहेत. त्या महिलांना बचतगटांच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम सौ. साधना माडये करत आहेत. त्या आहेत आपल्या आजच्या नवदुर्गा !


स्त्रीमध्ये उपजतच एक शक्ती असते. मुळात शक्ती हा शब्दच मुळी स्त्रीलिंगी आहे. या नारीशक्तीला योग्य पाठबळ मिळाले कि ती शक्ती नक्कीच चांगल्या विधायक कामाच्या उपयोगात येते. सौ. साधना सतीश माडये यांच्या बाबतीत सुद्धा हेच झाले. सौ. साधना यांनी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयातून बी. कॉम ची पदवी घेतली. त्यांनतर जीडीसीए हि परीक्षा देखील त्या उत्तीर्ण झाल्या. नंतर पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी नामांकित दैनिक आणि सोशल मीडिया चॅनलमध्ये आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवला.
परिस्थितीमुळे नोकरी करावी लागली असली तरी सौ. साधना यांचा पिंड मात्र उद्योजिकतेचाच होता. त्यामुळे पती सतीश यांच्या साथीने त्यांनी छोटामोठा व्यवसाय करायला सुरुवात केली. सुरुवातीला पतीच्या व्यवसायात हातभार लावला. त्यानंतर काही वर्षाने पिंगुळी गावात मोबाईल शॉपी सुरु केली. त्या जोडीला अनेक पूरक व्यवसाय सुरु केले.
एक वर्ष त्यांनी पिंगुळी ग्राम पंचायतीची निवडणूकसुद्धा लढवली. त्यात त्यांना अपयश आले असले तरी त्यांना आपल्या संघटन कौशल्याची आणि नेतृत्वगुणांची नव्याने ओळख झाली. त्यातूनच बचतगट महिलांची चळवळ प्रवास सुरु झाला. आज त्यांच्याकडे अडीज ते ३ हजार महिलांचं संघटन आहे. सिंधुकला प्रभाग संघ पिंगुळीच्या त्या अध्यक्षा आहेत. या प्रभाग संघात पिंगुळीसह साळगाव, मुळदे, तुळसुली, मांडकुली आणि भोयांचे केरवडे येथील महिला आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एकूण दहा ग्रामसंघ काम करतात. एका ग्रामसंघात ३० गट असतात. साधारण दहा महिलांचा एक गट असतो. अशा प्रकारे सुमारे ३०० महिलांचा एक ग्रामसंघ असतो. सौ. साधना दहा ग्रामसंघांचे नेतृत्व करत आहेत. या दहा पैकी पिंगुळी आणि साळगाव मध्ये प्रत्येकी तीन ग्रामसंघ आहेत.


सिंधू प्रभाग संघ पिंगुळीशी २०० महिला समूह म्हणजेच बचतगट संलग्न आहेत. या सर्व समूहांमध्ये समन्वय साधण्याचे काम सौ. साधना कुशलतेने करतात. या सर्व महिला आपल्या समूहाच्या माध्यमातून विविध उद्योग-व्यवसाय करत असतात. त्यांच्या वेळोवेळी मिटिंग होतात. त्यामध्ये सौ. साधना यांचे मोलाचे मार्गदर्शन या महिलांना मिळते. या समूहांनी कर्ज घेतलेले असते. त्या कर्जाची परतफेड होण्याकडे सौ. साधना यांचा बारीक लक्ष असतो. स्वतः एक उत्तम हिशेबनीस असल्याने त्यांचे हिशेबाचे काम अगदी चोख असते.
सिंधूकला प्रभाग संघ पिंगुळीच्या माफर्त वेगवेगळे उपक्रम देखील राबविले जातात. आरोग्य शिबिरे, महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम, उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन अशा कार्यक्रमातून महिलांना योग्य मार्गदर्शन मिळते. लर्निंग लाईन फाउंडेशनच्या कार्यक्रमात देखील सौ. साधना आणि त्यांची टीम सहभागी झाली होती. सिंधूरत्न योजनेतून सुद्धा त्यांनी अनेक महिलांना लाभ मिळवून दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला स्वावलंबी झाल्या आहेत. कर्जपरतफेड नियमित करणे, गटामार्फत बीज भांडवल प्रस्ताव तयार करणे याकडे सौ. साधना यांचा लक्ष असतो.


स्वतःचा मोबाईल शॉपीचा व्यवसाय, प्रभाग संघाचे नेतृत्व एवढे सगळे करून सुद्धा घर-संसाराची जबाबदारी सुद्धा त्या उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. मनस्वी आणि वरद हि त्यांची दोन्ही मुले हुशार आहेत. सौ. साधना उभयता व्यवसायानिमित्त घराबाहेर असली तरी त्यांचे आपल्या मुलांकडे लक्ष असतेच. मुलांना चांगले संस्कार देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यांचे पती सतीश माडये हे गावचे पोलीस पाटील आहेत. त्यांच्या व्यवसायात देखील त्या नेहमीच मदत करत असतात.

गेली सहा वर्ष सौ. साधना माडये या एक महिला व्यावसायिक म्हणून आपला नावलौकिक टिकवून आहेत. त्याच बरोबर बचत गटाच्या महिलांचे नेतुत्वदेखील त्या यशस्वी पणे करत आहेत. शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने या आदिशक्तीला नमन आणि पुढील कार्याला स्काय न्यूज टुडे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !!
- ✒️ सीनियर रिपोर्टर : निलेश जोशी

