- मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत वाढदिवस अभिष्टचिंतन

यतीन परशुराम खोत…. या युवा नेतृत्वाने सिंधुदुर्गच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आपली विशेष ओळख आपल्या कार्यकर्तृत्वाने निर्माण केली आहे… सामाजिक आणि राजकीय पटलावर यतीन खोत यांच्या कार्याची पोचपावती जनतेनेच त्यांना बहाल केलेली कार्यसम्राट या पाच अक्षरांतुन स्पष्ट करणारी ठरते.
सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणे. तन, मन आणि धन अर्पून जनसेवा करत राहणे. हे यतीन यांच्यासाठी नित्याचेच बनले आहे.
त्याच्या लोकसेवक प्रवासाच्या वाटचालीवर नजर टाकल्यास नगरसेवक पदाच्या सुरवातीच्या काळात लक्षवेधी आंदोलने, प्रभागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी यतीन यांनी जनतेचा आवाज बनून आक्रमक व डॅशिंग पद्धतीने कार्य केले. त्यांच्या कामांचा धडाका व यशाचा आलेख वाढताच राहिला. यामागे यतीन यांची प्रचंड मेहनत आहे. जनतेशी सातत्याने थेट संपर्क ठेवून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांच्या समस्या मार्गी लावणे, प्रशासन स्तरारावरील समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून सोडवून घेणे. जनतेला अपेक्षित असा विकास साध्य करताना विकासकामांना प्राधान्य देणे, नवनवे उपक्रम राबवणे हा यतीन खोत यांचा नित्यक्रम बनला आहे.


जनसेवा, जनसेवा आणि जनसेवा हेच धेय्य घेऊन राजकारणात आलेल्या यतीन खोत यांनी नगरसेवक ते बांधकाम सभापती या पाच वर्षे कार्यकाळात जनतेप्रति प्रामाणिक कार्यातून 'कार्यसम्राट युवा नेतृव' हा लौकिक प्राप्त केला.
मालवण नगरपालिका सभागृहातही जनतेच्या प्रश्नांवर व विकासकामांबाबत त्यांचा आग्रही व आक्रमकपणा वेळोवेळी दिसून आला. त्यांनी मांडलेले अभ्यासू व लक्षवेधी मुद्दे प्रशासनास गतिमानता आणण्यात जनातेच्या समस्या सोडवण्यात महत्वपूर्ण ठरले.
यतीन खोत यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची तर…. समाजकार्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. त्यांच्या आई सौ. पूनम खोत यांनी हडी गावचे सरपंच पद व मालवण तालुक्याचे पंचायत समिती सभापतीपद भूषवले. यतीन यांच्या वडिलांचा गावात आदरपूर्वक दरारा राहिला. गावात एकहाती सत्ता खेचून आणण्याची धमक यतीन यांच्या वडिलांनी दाखवून दिली. नंतरच्या काळात त्यांनी उद्योग व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित केला. एकूणच यतीन यांच्यामध्ये आईवडिलांचे अनेक गुण दिसून येतात.



यतीन यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण करून घरच्या उद्योग व्यवसायापेक्षा जनसेवेकडे अधिक लक्ष दिले. मित्रपरिवराच्या आग्रहाखातर २०११ ची पालिका निवडून अपक्ष नगरसेवक उमेदवार म्हणून लढवायची हा घेतलेला निर्णय यतीन यांनी काही कारणांनी शेवटच्या क्षणी रद्द केला. मात्र समाजसेवा सुरूच ठेवली. २०१६ ला मालवण पालिकेची पंचवार्षिक निवडणूक उभी ठाकली. ही निवडणूक लढवायचीच हा पक्का निर्णय यतीन यांच्या मित्रपरिवाराने केला. मात्र निवडणूक अपक्ष लढवायची की कोणत्या पक्षातून हा निर्णय बाकी होता. अखेर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नेतृत्व मानून यतीन यांचा त्यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.


यतीन यांना काँग्रेस पक्षाकडून मालवण पालिका निवडणुकीसाठी उमेदवारीही मिळाली. अन सुरू झाला प्रचाराचा झंझावात. त्यावेळी यतीन खोत यांच्या प्रभागातील निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरली. कोण जिंकणार याबाबत पैजाही लागल्या होत्या. मात्र यतीन खोत यांनी जनतेच्या भरघोस पाठिंब्यावर विजयी गुलाल उधळत दणक्यात पालिकेत प्रवेश केला.
त्यानंतर यतीन यांनी मागे वळून बघितलेच नाही. 'माझा प्रभाग माझे कुटुंब' याप्रमाणे त्यांचे कार्य सुरू झाले. त्यांच्या कामाची शैली पाहून शहरातील अन्य प्रभागातील काही नागरिक समस्या घेऊन त्यांच्याकडे येऊ लागले. त्या समस्याही आपल्या परीने सोडवण्याला यतीन यांनी प्राधान्य दिले. सुरवातीच्या काळात प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी त्यांनी केलेली आंदोलने मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर लक्षवेधी ठरली.
वीज समस्यांसाठी त्यांनी केलेले मेणबत्ती तसेच पणती आंदोलन अनोखे असे होते. वीज वितरण, बीएसएनएल, बांधकाम विभाग याठिकाणी त्यांनी वेळोवेळी धडक दिली, आग्रही भूमिका घेत समस्या मार्गी लावल्या. पालिका स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी जनतेसह पालिकेवरही धडक देत अधिकाऱ्यांनना जाब विचारला. ते धडक आंदोलन त्यावेळी चर्चेचे ठरले. यासोबत प्रभागातील सांडपाणी प्रश्न सोडवण्या बाबत यतीन यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला.



दरम्यानच्या काळात बदलत्या राजकीय परिस्थितीत यतीन खोत व अन्य चार नगरसेवक शिवसेना (उबाठा) पक्षात दाखल झाले. थेट मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेना प्रवेश झाला. दरम्यानच्या काळात मालवण पालिकेतील सभापती निवडणुक पार पडली. या निवडणुकीत बांधकाम सभापती पदी अनपेक्षित रित्या यतीन खोत यांची वर्णी लागली. आणि शहर विकासाची मोठी जबाबदारी यतीन खोत यांच्याकडे आली.
यतीन यांनी तत्कालीन खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक गतिमान पद्धतीने काम सुरू केले. खड्डेमुक्त मालवण शहर या संकल्पनेतून रस्ते विकासाला गती दिली. संपूर्ण शहराला न्याय देण्याचा दृष्टीने विविध प्रकल्प, योजना अंमलात येत असताना शासन स्तरावरून निधीही प्राप्त होण्याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला. निधी प्राप्त होतही होता. मात्र कोरोनाचे संकट सर्वत्र पसरले. विकास प्रक्रियेला ब्रेक लागला. मात्र उपलब्ध होत असलेल्या निधीतून शहर विकासाचे चक्र यतीन खोत यांनी सुरू ठेवले.


कोरोना संकट काळात त्याचे सेवाकार्य नेहमीच राहिले. गरजवंतांना मदतीचा हातही यतीन यांनी वेळोवेळी दिला. आरोग्य क्षेत्रातील त्यांचे सेवाकार्य अखंडितपणे सुरू आहे. आपल्या माध्यमातून जनतेची सेवा करायला मिळते माझे भाग्य असल्याचे खोत सांगतात.
मालवण शहरासोबत तालुक्यातील अनेक गावात यतीन खोत यांचा चांगला संपर्क आहे. ग्रामपंचायत व अन्य निवडणुकीत त्या ठिकाणी पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पुर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच दिसून आला.



प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नीची मोलाची साथ असते. हे यतीन यांच्या बाबतीत तंतोतंत खरे आहे. पत्नी सौ. शिल्पा यांची साथ यतीन यांना नेहमीच मिळत गेली. शिल्पा याही स्वतः पुढाकार घेऊन सामाजिक स्तरावर काम करत राहिल्या. शिल्पा व यतीन खोत यांच्या संकल्पनेतून मालवणात स्वराज्य महिला ढोल-ताशा पथकची मुहूर्तमेढ रोवली गेली. जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर या ढोल पथकाचा आवाज घुमला, या ढोल पथकाने सर्वत्र नावलौकिक मिळवला. या सोबतच मालवणच्या प्रसिध्द नारळी पौर्णिमा उत्सवात हजारो महिलांच्या उपस्थितीत साजरी होणारी शिल्पा खोत, यतीन खोत यांच्या संकल्पनेतील महिलांची नारळ लढवणे स्पर्धा मालवणचे आकर्षण बनली. नवरात्र उत्सवात महिलांच्या गरबा-दांडिया नृत्य व अन्य स्पर्धा. या शिल्पा यांच्या संकल्पनेतून साकार झाल्या. सर्व वयोगटातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. रक्तदान चळवळ उभी करणे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे, गरीब गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे. यासाठी शिल्पा यतीन खोत दाम्पत्य, खोत परिवाराचा नेहमीच पुढाकार राहिला.



मालवण नगरपालिकेतील नगरसेवक यांचा पाच वर्षे कार्यकाळ संपून तीन वर्षे होत आलीत. मात्र अद्याप निवडणुका लागल्या नाहीत. मात्र पद असो व नसो जनसेवेच्या माध्यमातून आपले कर्तव्य करत रहायचे. यानुसार यतीन खोत यांचे कार्य सुरू आहे आणि सुरू राहील…!
कार्यसम्राट नेतृत्व यतीन खोत यांचा राजकीय व सामाजिक पटलावरील यशस्वीतेचा आलेख असाच चढता राहावा. त्यांच्या हातून जनसेवा घडत रहावी. त्यांना व त्यांच्या कुटुंबियाना निरोगी दिर्घायुष्य लाभो. हीच सदिच्छा.
माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
*********************************************************************************************************

