साई कलामंच आणि सखे सोबती यांचे आयोजन
दहीहंडी उपक्रमाला सामाजिक कार्याची जोड
कुडाळ : साई कला क्रीडा मंच पिंगुळी कुडाळ आणि सखे सोबती दहीहंडी मित्रमंडळ पिंगुळी यांच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून आनंदवन पिंगुळी तिठा येथे भव्य दहीहंडीचा थरार रंगणार आहे. एक गाव एक दहीहंडी हे या दहीहंडी उत्सवाचे खास वैशिट्य आहे. या दहीहंडी उत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड असून विविध शिवकालीन खेळ, डीजे, ढोलताशा, आकर्षक लाइटिंग, एलईडी स्क्रीन अशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत. तसेच यावेळी पहिल्यांदाच पिंगुळी भूषण पुरस्काराची घोषणा देखील करण्यात येणार आहे. अशी माहिती साई कला मंचचे अध्यक्ष भूषण तेजम आणि अमित तेंडुलकर यांनी दिली. पिंगुळी येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना भूषण तेजम म्हणाले, यंदाचे हे दहीहंडी उत्सवाचे तिसरे वर्ष आहे. जवळपास २ हजार लोकांची उपस्थिती या दहीहंडी उत्सवाला असते. पिंगुळी गावाची मानाची सात थरांची दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला २५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीसआणि आकार्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. सहा थरांची सलामी देणाऱ्या संघाना रु. ३ हजार ५००, पाच थरांची सलामी देणाऱ्या संघाना रु. २ हजार ५००, आणि चार थरांची सलामी देणाऱ्या संघासाठी रु. १ हजार ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्याच बरोबर या सर्वाना आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने पिंगुळी गावातील नामवंतांच्या, विशेष प्राविण्य मिलविणारे विद्यार्थी, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला जाणार आहे. या दहीहंडी उत्सवात जिल्ह्याबरोबरच जिल्ह्या बाहेरील १२ ते १५ नामवंत गोविंदा पथकांचा सहभाग असणार आहे. त्याच बरोबर ढोलताशा पथक, शिवकालीन खेळ, लाठ्याकाठ्या, बनाटी यांची प्रात्यक्षिके असणार आहेत.
यावेळी बोलताना अमित तेंडुलकर यांनी सांगितले, या दहीहंडी उत्सवाचा शुभारंभ नामवंत रीलस्टार, सेलिब्रेटी, मान्यवर यांच्या उपस्थिती होणार आहे. तसेच पिंगुळी गावात वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या नामवंत डॉक्टर्सच्या यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. पिंगुळी भूषण पुरस्काराची घोषणा करून त्या पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका,सत्कार, दहीहंडी वर आधारित नृत्याविष्कार देखील सादर होणार आहेत. महिला गोविंदा पथक देखील या उत्सवात सहभागी होणार आहेत. या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी भूषण तेजम आणि अमित तेंडुलकर यांच्यासह दीपक गावडे, संग्राम खानोलकर, वैभव दाभोलकर, मयूर लाड, राज वारंग, प्रियदर्शन कुडव, दिनेश आसोलकर, सतीश माडये आदी उपस्थित होते.

