विशेष प्राविण्य सोन्याचा हार
मालवणी संस्कृती व वारसा मंडळ यांच्या वतीने महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा
जुबेर खान | मालवण : मालवण बंदर जेटी येथे दरवर्षीप्रमाणे मालवणी संस्कृती व वारसा मंडळ यांच्या वतीने यावर्षी देखील नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे ९ वे वर्ष असून १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता मालवण बंदर जेटी येथे ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या महिलांना प्रथम क्रमांक पैठणी, सोन्याची नथ सोबत दहा लाखाचा विमा, द्वितीय क्रमांक पैठणी, सोन्याची नथ व सोबत दहा लाखांचा विमा, तृतीय क्रमांक पैठणी व चांदीची पैंजण, चतुर्थ क्रमांक पैठणी आणि चांदीचे पैंजण यासोबतच स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या महिलेस ९ ग्रॅम सोन्याचा हार देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणारे किंवा स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या महिला भगिनींना सामाजिक संदेश असलेली कूपन देण्यात येणार आहे, तसेच या कुपन मधून लकी ड्रॉ देखील काढण्यात येणार आहे, आणि या लकी ड्रॉ मधून मोबाईल व इतर आकर्षक बक्षीस ही महिलांना देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी स्पर्धकांना नारळ मंडळाकडून देण्यात येणार आहेत, तरी जास्तीत जास्त महिला स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अरविंद मोंडकर-९८९२०५५८२०, गणेश पाडगावकर- ९४२३२१४७४५, स्नेहल मेथर-९७०२६०४७२०, ममता तळगावकर- ९४२०२६०१४१ यांच्याशी संपर्क साधावा.

