मालवण | प्रतिनिधी : सामाजिक एकोपा, परंपरा आणि समाजहिताची भावना जपत उभारण्यात आलेल्या श्री देवी भैरवी मंदिर सभागृहाचे उद्घाटन उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, नाभिक समाजाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पारंपरिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाने समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक जिव्हाळ्याचे दर्शन घडवले.
सभागृहाच्या उद्घाटनावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी नाभिक समाजाच्या प्रगतीचा विशेष उल्लेख केला. “नाभिक समाज हा केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपणारा आणि संघर्षातून पुढे आलेला समाज आहे. शिक्षण, उद्योग, राजकारण आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत आजसमाजातील युवक उल्लेखनीय कामगिरी करत आहेत,” असे सांगत त्यांनी समाजातील तरुणांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले.

राजकीय भूमिकेबाबत भाष्य करताना त्यांनी समाजाने केवळ मतदानापुरते मर्यादित न राहता निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे मत व्यक्त केले. समाजाची ताकद केवळ संख्येत नसून संघटित विचारांमध्ये असते. आपल्या प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी समाजाने ठाम भूमिका घेणे काळाची गरज आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत भैरवी मंदिर सभागृह हे भविष्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही या सभागृहामुळे समाजातील कार्यक्रमांना नवे व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.समाजातील एकोप्याची परंपरा अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. श्री भैरवी मंदिर परिसरात झालेला हा सोहळा ग्रामस्थांच्या स्मरणात राहणारा ठरला.
यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेविका मेघा गावकर,नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण,नाभिक समाज तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, आनंद आचरेकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, उद्योजक मधुकर चव्हाण तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना कांता चव्हाण यांनी मंदिर उभारणीसंदर्भात आणि सभागृह बांधणीसाठी योगदान दिलेल्या सर्व नाभिक बांधवांच्या आणि समाजातील इतर दानशून मंडळीच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी उद्घाटन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
आता नविन पिढीने पुढे यावे - विजय चव्हाण
मालवण शहरातील नाभिक समाजाचे कार्य संपूर्ण जिल्ह्यात आदर्शवत आहे. मंडळाची एकी आणि समाजासाठी धावून जाण्याचीवृत्ती यामुळे आता पुढील पिढीने समाजाच्या कार्यात पुढाकार घेऊन ते पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत. समाज एकसंघ आणि मजबुत ठेवण्यासाठी आम्ही आजपर्यंत योगदान दिलेले आहे,आता कुठेतरी थांबावसं वाटत आहेत. तरूणांनी अशाचप्रकारे एकत्रित राहून काम करावे.सर्वसामान्य नाभिक समाजाच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उदय चव्हाण, विजय चव्हाण, मिहीर चव्हाण, भुषण चव्हाण, अंकुश चव्हाण, लवू चव्हाण, ललीत चव्हाण, हेमंत चव्हाण, देवेंद्र चव्हाण, चिन्मय चव्हाण, रोहन चव्हाण भाग्यश्री चव्हाण, आबली चव्हाण,तेजस चव्हाण, लिशा चव्हाण, राकेश चव्हाण, दिलीप वायंगणकर, आप्पा चिपकर,उद्देश चव्हाण, जगदीश वालावलकर, जयेश कुबल तसेच नाभिक समाज बांधवांच्या कार्यकर्त्यांनी महेनत घेतली होती.
मंदिरासाठी योगदान देणाऱ्या कुटंबियांचा सन्मान
सभागृह आणि श्री भैरवी मंदिर उभारणीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या समाज बांधवांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारताना अनेकांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू तरळताना दिसत होते. वर्षानुवर्षे समाजासाठी निस्वार्थ भावनेने केलेल्या परिश्रमांची दखल समाजाने घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि अभिमान झळकत होता. मंदिर आणि सभागृहाच्या उभारणीत प्रत्येकाने आपल्या परीने दिलेला हातभार हा केवळ आर्थिक नव्हता, तर समाजावरील प्रेम आणि श्रद्धेचे प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त होत होती.समाजाच्यावतीने करण्यात आलेला हा सत्कार म्हणजे त्यांच्या त्याग, मेहनत आणि समर्पणाला दिलेला मान होता. ज्येष्ठ समाज बांधवांचा सन्मान होत असताना उपस्थितांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करत "हीच खरी समाजाची ताकद असल्याची भावना व्यक्त केली.समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींना मिळालेला हा सन्मान पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
▪️अमित खोत | मालवण

