निवेदन वरती पाठवलं, हेच प्रशासनाकडून उत्तर
उपोषणकर्ते उपोषणावर ठाम
कुडाळ | प्रतिनिधी : ज्या शेतकऱ्यानी एमआयडीसी होण्यासाठी शासनाला आपली जागा अगदी अल्प मोबदल्यात दिली, त्या शेतकऱ्यांना आता तिथे स्मशानभूमी होण्यासाठी, स्मशानभूमीला जागा मिळण्यासाठी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनी उपोषणाला बसून शासनच लक्ष वेधाव लागत आहे. नेरूर वाघचौडी इथले प्रकल्पग्रस्त शेतकरी श्याम गावडे हे गेल्या तीन वर्षापासून स्मशानभूमीसाठी उपोषण करत आहेत. पण अजूनही एमआयडीसी प्रशासनानं त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे यंदा सुद्धा त्यांना याच मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण करावे लागत आहे.
प्रकल्पग्रस्त श्याम गावडे हे आपल्या सहकारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह उपोषणाला बसले आहेत. एमआयडीसी कडून समाशंभूमीसाठी 3 गुंठे जागा आणि स्मशानभूमीला जोडरस्ता अशा मागण्या श्याम गावडे यांनी एमआयडीसी प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. यासाठी ते तीन वर्षे उपोषण करत आहेत. पण तुमची मागणी वरिष्ठांकडे पाठवतो, अस उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळतं. पण प्रश्न काही सुचत नाही. आज देखील एमआयडीसी अधिकारी चर्चा करण्यासाठी उपोषणकर्त्याना भेटले. तुमची मागणी वरीष्ठना कळवतो अस उत्तर त्यानी उपोषणकर्त्याना दिलं आणि निघून गेले. तुम्हाला काही अधिकार नाहीत तर सक्षम अधिकारी घेऊन या अशी मागणी संतप्त उपोषणकर्त्यानी केली. पण उपोषणकर्त्यांचं समाधान झालं नाही. दरम्यान ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका श्याम गावडे यांनी घेतल्याच सांगितलं.
या उपोषणस्थळी नेरूर सरपंच भक्ती घाडी यांनी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा दिला. यावेळी अजित मार्गी, मंगेश राऊत, अनिल गावडे, आनंद गावडे, बाळकृष्ण गावडे, सुरेश गावडे, संदीप गावडे, अरुण गावडे, मंगेश गावडे, शिल्पा गावडे उपस्थित होते. मृत्यूनंतर केवळ अंतिम संस्कार करण्यासाठीच या प्रकल्पग्रस्तांना 3 गुंठे जागा हवीय पण त्यासाठी सुद्धा एमआयडीसी प्रशासनासोबत त्यांना संघर्ष करावा लागतोय हीच खरी शोकांतिका म्हणावी लागेल.

