प्रेशर कुकर योजनेंतर्गत घेण्यात आला लाभ
मालवण | प्रतिनिधी : सुकळवाड ग्रामपंचायत सदस्या प्रमिला पंढरी पाताडे यांनी सदस्य पदाच्या काळात ग्रामपंचायत १५ टक्के मागासवर्गीय लेखाशीर्षाखाली प्रेशर कुकर या योजनेंतर्गत आपल्या पती मार्फत लाभ घेतला असल्याची तक्रार वैदेही मोरजकर यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार चौकशीअंती गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला आहे. त्यानुसार सौ. पाताडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सौ. मोरजकर यांनी केली आहे.
सुकळवाड ग्रामपंचायत सदस्या प्रमिला पाताडे यांनी सन २०२२-२३ या वर्षात १५ टक्के मागासवर्गीय योजनेंतर्गत लाभ घेतला असल्याची तक्रार वैदेही मोरजकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सौ. पाताडे यांनी लाभ घेतल्याचे आढळून आले. यामुळे सौ. पाताडे यांनी ग्रामपंचायत सदस्या म्हणून १५ टक्के लाभ घेत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ (ग) चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी शिफारस गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात केली आहे. त्यानुसार सौ. पाताडे या ग्रामपंचायत सदस्या म्हणून अपात्र ठरत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून त्यांच्यावर कारवाईसाठीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. तरी सौ. पाताडे यांच्यावर तात्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सौ. मोरजकर यांनी केली आहे.

