रुपेश करलकर आणि उमेश चव्हाण आणि मित्रमंडळ यांचे यशस्वी आयोजन
मालवण: मालवण तालुक्यातील रेवतळे येथे रुपेश करलकर आणि उमेश चव्हाण मित्रमंडळ आयोजित एक गाव एक संघ पावसाळी रबर बॉल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये रेवतळे महापुरुष संघ हा विजेता ठरला तर आर्या स्पोर्ट्स, वायरी हा संघ उपविजेता ठरला.
रेवतळे येथे रुपेश करलकर आणि उमेश चव्हाण मित्रमंडळ आयोजित एक गाव एक संघ चार दिवसीय पावसाळी रबर बॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यावेळी रेवतळे महापुरुष या विजेत्या संघाला रोख रुपये २०,००० व आकर्षक ट्रॉफी व उपविजेत्या आर्या स्पोर्ट्स संघाला रोख रुपये १०,००० व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली, यामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रसाद राणे, उत्कृष्ट फलंदाज सुनील मालवणकर,उत्कृष्ट गोलंदाज पायस अल्मेडा ठरले.या संपूर्ण स्पर्धेचा सामनावीर विशाल लुडबे यांना वायुसूत कम्युनिकेशन चे सत्यम पाटील यांच्या वतीने स्मार्टवॉच देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे शिवसेना( उबाठा) जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सन्नी परुळेकर, ललित चव्हाण, रवी मिठकर, गणेश करलकर, कॅलिस फर्नाडीस, डॅनी फर्नाडीस , अंब्रोज अल्मेडा उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेचे समालोचन प्रदीप देऊलकर आणि रोहन कदम यांनी केले.स्पर्धेस युट्युब लाईव्ह माध्यमातून ही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

