मालवण | प्रतिनिधी : जि. प. प्राथमिक शाळा तिरवडे नं. १ शाळेत पालकांसाठी रानभाजी - तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पालक-ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग दर्शविला.
रानभाजी प्रथम सौ. ललिता लवू कदम (निवडुंग भाजी) व्दितीय सौ. अमृता अमित तिळवे (एकपान भाजी) तृणधान्य प्रथम रूपाली अनिल गावडे (वरीची बर्फी) व्दितीय सुवर्णा संतोष तिळवे (ज्वारीचे वडे) सर्व विजेत्यांना जिल्हा परिषद शाळा तिरवडे यांच्यामार्फत प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले
पावसाळ्यात खास करून ऑगस्ट महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगली रानभाज्यांची रेलचेल असते. अळंबी, कर्टूले, टाकळा, कूरुडू, एक पान
भारंगी, अळू, पेवगा, निवडुंग, कुड्याच्या शेंगा, घोट्याची वेल, टाकळा, दुधुर्ली या सारख्या शेकडो भाज्या रानात उगवतात.
मुख्याध्यापक सौ. उन्नती कराळे यांच्या संकल्पनेतून व उपशिक्षक श्री. गणेश खरात यांचे सहकार्याने पालकांचा शाळेकडील सहभाग वाढावा म्हणून हा उपक्रम घेण्यात आला. या स्पर्धेत १३ स्पर्धकांनी २०-२५ प्रकारच्या रानभाज्या आणि नाचणी, तांदळा पासून बनवलेली स्वादिष्ट आणि पौष्टिक व्यंजने प्रदर्शित करण्यात आली. स्पर्धेसाठी चंद्रसेन पाताडे (प्राथमिक शिक्षक) तसेच आरती कांबळी (विषय तज्ञ) यांनी स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून लाभले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक कराळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. पर्यवेक्षकाने भाज्यांची माहिती विचारून, निरीक्षण करून भाज्यांच्या चवी घेऊन सहभागी स्पर्धकातुन प्रथम व द्वितीय असे क्रमांक काढण्यात आले.
बक्षीस वितरणाच्या वेळी चंद्रसेन पाताडे यांनी रानभाज्यांचे महत्त्व तृणधान्य चे महत्त्व, पोषण आहारातील गरज या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन केले. आजच्या काळात रानभाज्या किती महत्त्वाच्या आहेत हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्याचप्रमाणे आरती कांबळी यांनी सर्व पालकांना पाककलेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या उपशिक्षक गणेश खरात यांनी सर्वांचे आभार मानले.

