तब्बल 12 लाख 65 हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी घेतली ताब्यात…
कुडाळ | प्रतिनिधी : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शहर येथील एटीएम मशीन मधील तब्बल १२ लाख रुपये रक्कम चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार चोरट्यांपैकी, दोन चोरट्यांना कुडाळ पोलिसांनी पकडले आहे. एक संशयीतास एटीएम मशीन कडून ताब्यात घेण्यात आले, तर दुसऱ्या आरोपीने पळ काढला होता, पण पणदूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र अन्य दोन आरोपीने कार गाडीतून पळ काढला ते अद्याप सापडून आलेले नाहीत. त्यांचा शोध सूरू आहे. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे दिली.
कुडाळ येथील खरेदी विक्री संघाच्या परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे हे एटीएम फोडून रोकड चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न उघड झाला, याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, खरेदी विक्री संघाच्या साधना बाजार जवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये कोणीतरी इसम संशयास्पद हालचाल करीत असल्याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली, त्याबरोबर राखीव असलेले पोलीस ममता जाधव, शांताराम वराडकर, रिडन बुथेलो, श्री चिंदरकर हे त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी त्या ठिकाणी एटीएम मशीनच्या गाळ्यामध्ये कोणीतरी काहीतरी करत असल्याचा आवाज येत होता.पण गाळ्याचे शटर बंद होते. राखीव पोलिसांनी सावधगिरी बाळगत आवाज दिला. त्याबरोबर एटीएम मशीन फोडून त्यामधील रोख रक्कम असलेले बॉक्स बाहेर काढून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. यामधील एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला, तर दुसरा आरोपी रोख रक्कम असलेला एक बॉक्स घेऊन हिंदू कॉलनीच्या दिशेने पळाला. त्याचा पाठलाग करण्यात आला मात्र तो अंधाराचा फायदा घेऊन पळाला. त्यानंतर राखीव पोलिसांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याशी संपर्क साधल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर, संजय कदम, रुपेश सारंग, कृष्णा केसरकर, अमोल महाडिक तसेच इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि पळ काढलेल्या चोराच्या मागावर गेले.
रोख रक्कमेचा बॉक्स घेऊन पळालेला चोर पणदूर येथे सापडला हा चोर हिंदू कॉलनी मार्गे महामार्गावर गेला. व त्यानंतर पावशी या ठिकाणी कोणाची तरी सायकल घेतली आणि सायकलच्या कॅरिअरला रोख रकमेचा बॉक्स टी-शर्टाने बांधून तो ओरोसच्या दिशेने जात असताना पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना तो महामार्गावर दिसून आला.त्याची चौकशी केली असता.त्याने सायकल व तो रोख रकमेचा बॉक्स तेथेच टाकून जवळच असलेल्या हातेरीवरून येणाऱ्या पावशी येथील नदीमध्ये उडी घेतली आणि पुन्हा तो पळाला.
सर्व पोलीस यंत्रणेला याबाबतची माहिती देण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यामध्ये सामील झाली. पणदूर येथे पोलीस यंत्रणा दाखल झाल्यावर त्या ठिकाणी एका दुकानांमध्ये वडापाव खात असताना हा आरोपी पोलिसांनी पकडला.
अन्य दोन आरोपी जे कार मध्ये होते ते पोलिसांची चाहूल लागतात, तेथून प्रसार झाले.त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान या चोरीमध्ये सुमारे १२ लाख ६५ हजार ९०० रुपये रक्कम मिळाली आहे.याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक गावडे यांनी नोटांची तपासणी केली.
या चोरट्याने सर्व सावधगिरी बाळगली होती. एटीएम मशीनच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर कट केल्या होत्या आणि त्यानंतर गॅस कटर चा वापर करून मशीन कापली आणि चोरी करायला सुरुवात केली. ही चोरी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास सुरू केली.
एटीएम मशीनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी दिल्ली येथे झाली. दिल्ली येथील कर्मचाऱ्यांनी मुंबई व नंतर कुडाळ येथे एटीएम मशीनच्या खोलीमध्ये काहीतरी वेगळ्या हरकती दिसत असल्याचे पोलीस यंत्रणेला कळवले, ही माहिती समजल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्याचे राखीव असलेले चार पोलीस कर्मचारी एटीएमच्या ठिकाणी दाखल झाले आणि ही चोरी उघड झाली.
पोलीसांना पकडलेल्या आरोपींची नावे क्र. १ अनिल अम्मीलाल बलोदा वय २५ वर्षे, रा. रायला, टाणा- पिलानी, तहसील- सुरजगढ, नि. झुणझूनू रा. राज्यस्थान क्र. २. वारीस जफरुद्दीन खान वय २६ वर्ष रा. विलासपूर, ठाणा/तहसील- तिजारा, जि. अलवर राज्य राज्यस्थान, अशी असून फरारी झालेल्या इसमांचो नावे ३. समशाद खान वय ३५ वर्षे (पूर्ण नाव पत्ता माहीती नाही) सद्या रा. पनवेल, मुळ रा. उत्तप्रदेश व आरोपीत क्र. ४. राजू आंबेकर रा. विलेपार्ले, मुंबई (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) अशो असल्याची अटक आरोपींकडून समजून आलेली आहेत. तसेच पळून गेलेल्या दोन आरोपींकडे मारुती झेन इस्टीलो वाहन क्र. MH ०२ CH ८०८५ हे वाहन असल्याचे निष्पन्न होत असून त्याबाबत तपास चालू आहे.

