कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर यांचे स्वार्थी मतलबी राजकारण व खेकडावृत्ती
सरपंच सिया धुरी यांचा थेट हल्लाबोल
मालवण : सरपंच सिया धुरी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे भुमिका मांडली आहे. कोळंब ग्रामपंचायत सरपंच या पदावर मला जवळजवळ दिडवर्षं पूर्ण झालं. या कालावधीत मी माझ्या सहकारी सदस्यांसोबत कोळंब ग्रामपंचायत मधील जनतेच्या हिताचं काम करत आहे तसेच सामाजिक उपक्रम देखील राबवित आहे.
सरपंच म्हणून कोळंब ग्रामपंचायत मधील जनतेने मला निवडून दिल्यावर या ग्रामपंचायत भागात जनहिताचे निर्णय घेणे हे मी माझं प्रथम कर्तव्य समजते, सरपंच म्हणून या पदावर बसल्या नंतर वरिष्ठ सदस्य म्हणून उपसरपंच विजय नेमळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व इतर पदाधिकारी यांच्या सोबतीने मी आजतागायत काम करत आले.
सरपंच म्हणून काम करत असताना प्रशासकीय तांत्रिक बाबी देखील कटाक्षानं पाहत आज पर्यंत काम केलं आणि यापुढे ही करणार आहे..मी उबाठा शिवसेना या गटातून या ठिकाणी असल्याने साहजिकच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी माझ्या कामातील त्रुटी काढत टिका - टिप्पणी करणं, तक्रारी करणं हे मी समजू शकते, कारण राजकारणात काम करत असताना, वावरताना या गोष्टींना सामोरे जावे लागत.
ग्रामपंचायत मध्ये आलेल्या निधीचा मी स्वतःसाठी खर्ची केलेला नाही वा मी स्व हित पाहिलं नाही, सर्वानुमते तो जनहिताच्या कामासाठी नियमानुसार केलेला आहे. या दरम्यान काही नैसर्गिक घटनांमुळे या खर्चावर काहीश्या तांत्रिक बाबी निर्माण झाल्या असतील तर त्या पूर्तता देखील करता येतात. असं असतानाही विरोधी पक्षाच्या सदस्यांने केलेल्या तक्रारी बाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नसतांनाही थेट आयुक्तांजवळ जाऊन माझ्यावर कारवाई करणेसाठी उपसरपंच विजय नेमळेकर यांनी प्रयत्न करणे व कोणताही प्रशासकीय निर्णय होण्याअगोदर जाहीररीत्या बातमी देण्यासाठी पुढाकार घेणं यावरूनच उपसरपंच विजय नेमळेकर यांचा हेतू व राजकीय प्रगलब्धता दिसून येते.
फक्त स्वतःच्या आपमतलबी फायद्यासाठी स्वार्थी राजकारण करणाऱ्या विजय नेमळेकर यांनी माझ्या विरोधात पक्षांतर्गत निर्माण केलेली ही खोटी मोहीम कधीच यशस्वी होणार नाही. ग्रामपंचायत मध्ये आजपर्यंत जनहिताच्या कामांमुळे जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आहे, हा विश्वास मी माझ्या कारकिर्दीत सार्थकी लावणारच आहे. परंतु खेकडावृत्ती - स्वार्थी मतलबी राजकारण करणाऱ्या उपसरपंच विजय नेमळेकर यांनी हे लक्षात ठेवावे की निवडणूका येतात जातात, पदे मिळतात न मिळतातं पण एखाद्या सदस्याला जाणून बुजून अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केला तर यापुढेही प्रत्येक बाबी - गोष्टीं मधील त्रुटी काढून तक्रारी केल्या जातील.
ग्रामपंचायत कामातील माझा अनुभव जरी कमी असला तरी राजकीय क्षेत्र हे माझ्यासाठी नवीन नसून माझे वडील कै. नामदेव मोंडकर व माझा भाऊ अरविंद मोंडकर यांकडून मी राजकिय डावपेच शिकलेली आहे.
गेली अनेक वर्षे विजय नेमळेकर हे या कोळंब - निव्हे - खैदा - कातवड या भागात कार्यरत आहेत, परंतु या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या, पावसाळी पाणी वाहून जाणारी छोटी गटारे व विविध मूलभूत सुविधा असे अनेक विषय आजही शिल्लक असून यासाठी आपल्या पदाचा वापर करावयाचे सोडून फक्त प्रत्येक कामात आपली मर्जी कशी राहील व आपला स्वार्थ कसा साधता येईल हेचं आजपर्यंत उपसरपंच विजय नेमळेकर यांनी काम केलं आहे.
उबाठा शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी अथवा संघटना हितासाठी कोणताही कार्यक्रम आयोजन न करता, पक्ष संघटना न वाढवता. संघटनेत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आपापसात गैरसमज पसरवणे, वरिष्ठांना चुकीची माहिती देणे हेचं काम विजय नेमळेकर यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या आयुष्यात केलं असून माझ्यावर कारवाई व्हावी माझं सरपंच पद जावं या हेतूने विरोधकांमार्फत तक्रार करणे व आता स्वतः आयुक्तांजवळ तक्रारी बाबत कारवाई करणेस पत्रव्यवहार करणे. यावरून दिसून येत की माझ्या विरोधातील हे संपूर्ण षडयंत्र उपसरपंच विजय नेमळेकर यांनीच रचले आहे व रचले असल्याचा संशय मला आहे.
उपसरपंच विजय नेमळेकर यांच्या या मनमानी कारभारा बाबत मी वरीष्ठ पदाधिकारी, आमदार वैभव नाईक यांजवळ सत्य परिस्थिती मांडली असून लवकरच यावर वरीष्ठ मार्ग काढतील अशी मला आशा आहे. सौ. सिया रामचंद्र धुरी सरपंच - कोळंब ग्रामपंचायत.

