मालवण | जुबेर खान : मालवण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालवण पोलीस दलाच्या वतीने आज सायंकाळी शहरातून संचलन काढण्यात आले. या संचलनाच्या माध्यमातून पोलिसांनी एक प्रकारे शक्तीप्रदर्शन करत नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
मतमोजणीच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेले हे संचलन मालवण बस डेपो येथून सुरू झाले. मुख्य बाजारपेठ आणि शहराच्या प्रमुख मार्गांवरून जात हे संचलन मालवण पोलीस स्टेशन येथे समाप्त झाले. या संचलनामुळे शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्ताचे कडेकोट वातावरण दिसून आले. मतमोजणीच्या निकालानंतर होणारी गर्दी आणि संभाव्य जल्लोष लक्षात घेता, पोलिसांनी आधीच शहराचा ताबा घेतल्याचे चित्र दिसत आहे.
हे संचलन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या संचलनाचे नेतृत्व मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी केले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर आता मतमोजणीचा टप्पाही तितक्याच पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी विशेष लक्ष देऊन आहेत.
मतमोजणीसाठी केवळ स्थानिक पोलीसच नव्हे, तर राज्य राखीव दल आणि दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. संचलनात राज्य राखीव पोलीस दल (SRPF) : २५ जवान, दंगल नियंत्रण पोलीस (RCP): ३० जवान, स्ट्रायकिंग फोर्स: १५ जवान, पोलीस अंमलदार: ६० कर्मचारी, होमगार्ड: ३५ जवान, अशा प्रकारे पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा मतमोजणी प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून असणार आहे.
मालवण नगरपरिषदेच्या मतमोजणीला उद्या सकाळी ९:३० वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, विजयाचा आनंद साजरा करताना नियमांचे पालन करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

