विद्यार्थ्यांनी घेतला मनमुराद आनंद
भाऊ भोगले | बागायत : शासनाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी वर्षा सहलीचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संतोषी मांजरेकर आणि त्यांचे सहकारी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजनबध्द 'वर्षा' सहल मसुरेतील चांदेर येथील माळावर / सड्यावर नेली. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावी अशा विद्यार्थ्यांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आले होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात आणि पावसाच्या पाण्यात माळराणावरील वाहणाऱ्या डोहात खेळत, बागडत मनमुराद आनंद लुटला.
सध्याच्या वैज्ञानिक आणि आधुनिक काळात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा फार मोठा ताण वाढत आहे. चार भिंतीच्या आत पुस्तकी ज्ञानाचा विद्यार्थी अभ्यास करत असल्याने, आपल्या परिसरतील भौगोलिक परिस्थिती, जैवविविधता, डोंगरांची तसेच ओढ्यांची निर्मिती याचा विद्यार्थ्यांना अभ्यास व्हावा व शालेय जीवनाबरोबरच या गोष्टींचे जतन व्हावे, विविध कौशल्यांचा विकास व्हावा, हाच दृष्टिकोन ठेवून शासनाच्या उपक्रमातील एक भाग म्हणून भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल, मसुरे यांनी वर्षा सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात बागडण्याची व रोजच्या अभ्यासाच्या तणावातून मुक्त करण्याची संधी दिली.
यावेळी श्री माळी सर यांनी स्वतःचे फार्म हाऊस विद्यार्थ्यांना जेवणासाठी उपलब्ध करून दिले. यावेळी काही पालक तसेच शाळा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माता काशीबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट स्थानिक कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी देखील या सहलीला भेट दिली.

