भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मधून सैनिकांना २६००० राख्या रवाना
जुबेर खान | मालवण : भावा बहिणीच्या नात्याचे प्रतीक असणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयातर्फे 'एक राखी सैनिकांसाठी सीमेवरच्या भावांसाठी' हा उपक्रम प्रा. पवन बांदेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून यावर्षी या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे.
देशाच्या सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधन निमित्त सैनिकांना राख्या पाठविणे हा स्तुत्य उपक्रम आहे. आज पुरुषांबरोबर महिलाही लष्करी सेवेत असून देशाचे रक्षण करत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींबरोबरच विद्यार्थ्यांनीही सीमेवरील आपल्या सैनिक बहिणींसाठी राख्या बनवल्या. सैनिक देशासाठी लढत असले तरीही देशातील नागरिकांनीही सैनिकांप्रमाणे सक्षम होऊन आपल्या कार्यातून देशासेवा करत राहणे गरजेचे आहे.
यावर्षी या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सोबतच सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी स्वतःच्या हाताने विक्रमी अशा २६,२०० एवढ्या विक्रमी राख्या बनवल्या असून त्या पोस्टाद्वारे देशाच्या सीमेवर विविध भागात तैनात असलेल्या सैनिकांना पाठविण्यात येणार आहेत. यासाठी माजी विद्यार्थी व टेक्नो कंपनीचे डायरेक्टर मंगेश कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मालवणचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले, भारतीय सेवा दलातील सेवा निवृत्त हवालदार राजन कुमटेकर, प्राचार्य हणमंत तिवले, प्रा. पवन बांदेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचे स्वागत करून त्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. पाहुण्यांचा परिचय प्रफुल्ल देसाई यांनी केली. प्रा. बांदेकर यांनी प्रास्ताविक करत गेली आठ वर्ष सुरु असलेल्या या उपक्रमाची माहिती दिली. तर यावेळी सर्वात जास्त राख्या बनविणारी विद्यार्थिनी मनाली पडावे हिच्यासह प्रेरणा परब, शुभवाणी मसुरकर, दिव्या मेस्त्री, ईशा शिरोडकर ,सृष्टी डांगमोडेकर, दिशा केळुसकर, यशश्री येशजी , पूर्वा आरोंदेकर, कृतिका भिसळे व इतर विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत, भारतीय सीमेवरील जवानांना गेली आठ वर्ष राख्या उपक्रम भंडारी कनिष्ठ महाविद्यालय राबवित आहे तो स्तुत्य असून यामुळे जवानांना नवीन ऊर्जा मिळेल असा आशावाद व्यक्त करीत , या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मालवणचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले, सेवा निवृत्त भारतीय सेवा हवालदार राजन कुमटेकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप खोड , सुधीर हेरेकर , पोलीस शिपाई प्रभाकर खडपकर, संस्थेचे लोकल कमिटीचे खजिनदार जॉन नरोगा , प्राचार्य हणमंत तिवले आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल देसाई यांनी केले. आभार सौ.वैभवी वाक्कर यांनी मानले.






