महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणारी कर्नाटकची नौका जप्त
देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर कारवाई करीत नौका जप्त केली आहे. ही कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तथा सुधारणा अधिनियम २०२१ च्या तरतुदींनुसार करण्यात आली आहे.
दि. ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १०.४५ वाजता देवगड समोर सुमारे 6-7 NM अंतरावर नियमित गस्तीदरम्यान, अंमलबजावणी अधिकारी श्री. किरण वाघमारे, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी, देवगड) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

कर्नाटक राज्याच्या जलक्षेत्रासाठी परवाना असलेली नौका “भारद्वाजा” (नोंदणी क्र. IND-KA-02-MM-4171) ही श्री. अशोक गोपाल सालिन (रा. मल्लपी, पो. कोडूवूर, उडुपी, कर्नाटक) यांच्या मालकीची असून, ही नौका महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात अनधिकृतपणे मासेमारी करताना आढळली.
या नौकेवर नौका तांडेलसह इतर खलाशी उपस्थित होते. नौका जप्त करुण ती देवगड बंदरात ठेवण्यात आली आहे. नौकेवर आढळलेल्या मासळीचा लिलाव प्रक्रिया सुरू असून, याबाबतचा अहवाल मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. सुनावणीअंती नौकेच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ही कारवाई अंमलबजावणी अधिकारी श्री. किरण वाघमारे (सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, देवगड ) यांनी पोलिस कर्मचारी श्री. पाटील तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक, देवगड यांच्या सहकार्याने श्री सागर कुवेसकर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली.

